सुमारे पाच वर्षांपूर्वी कोरोना विषाणू राज्यात धुमाकूळ घालत असतानाच जून २०२० मध्ये आठवडाभराच्या अंतराने झालेल्या दोन संशयास्पद आत्महत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिने आत्महत्या केल्यानंतर आठवडाभरातच १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत हाही त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत सापडला होता. दरम्यान, या दोन्ही मृत्यूंमागच्या कारणांचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यातच दिशा सालियान हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायायालयात याचिका दाखल करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहेत. त्यापाठोपाठ आता सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
के. के. सिंह म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूप्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही पाटण्याला होतो. तेव्हा आम्ही जे ऐकलं होतं, त्यानुसार दिशा सालियानचा अपघात झाला होता. हा अपघात असल्याचं दर्शवण्यात आलं होतं. मात्र तिला प्रत्यक्षात इमारतीवरून खाली ढकलण्यात आलं होतं. ती सुशांतची माजी मॅनेजर होती, आम्ही हेच ऐकलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ते पुढे म्हणाले की, सुशांत टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवणारा व्यक्ती नव्हता. त्याचा मृत्यू होण्यापूर्वी आठवडाभर आधी मी त्याच्याशी बोललो होतो. त्याच्या बोलण्यावरून तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. दरम्यान, या प्रकरणात काही सबळ निष्कर्ष हाती येत नाही तोपर्यंत न्याय झाला, असं कसं म्हणता येईल, असा सवालही त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत उपस्थित केला.
सुशांतचे वडील पुढे म्हणाले की, आता राज्यातील सरकार बदललं आहे. तसेच सध्याच्या सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधील पोलिसांनी या प्रकरणाच योग्य पद्धतीने तपास केला नव्हता. तेव्हा ते पोलीस कुणाच्या दबावाखाली होते, हे माहिती नाही. मात्र आता सरकार बदललं आहे. त्यामुळे सध्याचं प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्व विश्वास आहे. ते जे काही करतील ते योग्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.