दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:50 IST2025-09-12T13:39:25+5:302025-09-12T13:50:47+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने न्यायालयाच्या आवारात घबराट पसरली आहे. एका धमकीच्या ईमेलमध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडूचा उल्लेख आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालयालाही धमकी आल्याची माहिती समोर आली.

दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान, आता मुंबई हायकोर्टालाही अशीच धमकी मिळाल्याची अपडेट आहे. दोन्ही कोर्टात मोठा गोंधळ सुरू आहे.
आज शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला एका ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. या धमकीच्या ईमेलमध्ये 'न्यायालयाच्या आवारात, विशेषतः न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आणि इतर भागात तीन स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. 'दुपारच्या नमाजानंतर स्फोट होऊ शकतो, असं या ईमेलमध्ये म्हटले आहे, तर दुपारी २ वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले होते. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणांना तात्काळ कारवाईला सुरुवात केली.
मुंबई हायकोर्ट रिकामे करण्यात आले
मुंबई हायकोर्टालाही धमकीचा ईमेल आला आहे. पोलिसांनी तपासणी सुरू केली असून पूर्ण कोर्ट रिकामे करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाला एक ईमेल मिळाला. यामध्ये म्हटले होते की, 'आज दुपारी नमाजानंतर लगेचच न्यायाधीशांच्या कक्षात स्फोट होईल. या ईमेलची माहिती मिळताच, सुरक्षेच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला. वकील आणि न्यायाधीशांना परिसरातून बाहेर काढण्यात आले. सध्या सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिसराची झडती घेतली जात आहे.
धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये काय आहे?
ईमेलचा पत्ता "kanimozhi.thevidiya@outlook.com" असे म्हटले आहे. ईमेलमध्ये लिहिले आहे की, "२०१७ पासून आमचे लोक पोलिसांमध्ये घुसले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या स्फोटामुळे मागील खोटे दावे स्पष्ट होतील. दुपारच्या नमाजनंतर लवकरच न्यायाधीशांच्या कक्षात स्फोट होईल."
यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या
मागील काही महिन्यांत दिल्लीतील शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल येण्याच्या घटना वाढल्या आहेत. अलिकडेच दिल्ली मुख्यमंत्री सचिवालय आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजलाही असेच धमकीचे ईमेल आले होते, हे नंतर खोटे असल्याचे सिद्ध झाले. यावेळीही हा ईमेल पूर्वीच्या धमक्यांसारखाच असू शकतो, असे पोलिसांचे मत आहे. पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली आहे.
#WATCH | Delhi | Delhi High Court receives a bomb threat via mail. Precautionary measures taken by the Delhi police and the court has been vacated. https://t.co/7mQhpAsLsUpic.twitter.com/IYOFFbna4n
— ANI (@ANI) September 12, 2025