दिल्ली, पंजाबनंतर आता गुजरातची वेळ, 'आप' भाजपाला हरवणार; अरविंद केजरीवाल यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:01 IST2022-05-02T11:57:33+5:302022-05-02T12:01:14+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला पराभूत करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. ते गुजरातच्या भरूच येथे बोलत होते.

दिल्ली, पंजाबनंतर आता गुजरातची वेळ, 'आप' भाजपाला हरवणार; अरविंद केजरीवाल यांचं आव्हान
भरुच-
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला पराभूत करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. ते गुजरातच्या भरूच येथे बोलत होते. गुजरातमधील भाजपा सरकारने पेपरफुटींबाबत जागतिक विक्रम केला आहे. शाळा व रुग्णालयांच्या स्थितीकडेही दुर्लक्ष केलं आहे. पण आम आदमी पक्ष या सर्व समस्या सोडवून जनतेला खरा विकास दाखवून देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी छोटुभाई वसावा यांच्या भारतीय ट्रायबल पार्टीशी (बीटीपी) युतीची घोषणा केली. 'आप'ला सत्तेत आणण्यासाठी मतदान करुन भाजपाची अरेरावी मोडून काढा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.
केजरीवाल यांनी गुजरात भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. "भाजपा आम्हाला घाबरत असल्यामुळेच गुजरातच्या निवडणुका लवकर होतील असं मी ऐकलं आहे. आम्ही दिल्लीत आणि नुकतंच पंजाबमध्ये सरकार स्थापन केलं. आता गुजरातची वेळ आली आहे. भाजपाला वाटतं की आम्हाला डिसेंबरपर्यत वेळ मिळाला तर गुजरातची जनता आम आदमी पक्षाकडे वळेल. पण तुम्ही निवडणुका आता घ्या किंवा सहा महिन्यांनी घ्या. तुमचा पराभव निश्चित आहे", असं रोखठोक आव्हान केजरीवालांनी भाजपाला दिलं आहे.