लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:15 IST2025-09-25T08:13:16+5:302025-09-25T08:15:25+5:30
१५ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी निदर्शने करत आहेत.

लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला, तर किमान ४५ जण जखमी झाले असून त्यात २२ पोलिसांचा समावेश आहे. ही गेल्या काही वर्षांतील सर्वात गंभीर घटना ठरली आहे.
१५ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी निदर्शने करत आहेत. मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याने निदर्शकांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. तेव्हाच हिंसाचार उफाळला. पोलिस व अर्धसैनिक दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अगदी गोळीबाराचाही वापर केला. दरम्यान, लडाख ॲपेक्स बॉडीच्या युवक शाखेने हा आंदोलनाचा मोर्चा काढला होता. ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणातील दोन जणांची प्रकृती मंगळवारी ढासळल्याने आंदोलन पेटले.
वांगचुक काय म्हणाले?
लडाखसाठी हा एक दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही उपोषण केले, लेह ते दिल्ली पर्यंत पायी चाललो. आज, आम्ही आमचा शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत. हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ सुरू आहे. मी लडाखच्या तरुण पिढीला हा मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो. आम्ही आमचे उपोषण सोडत आहोत आणि निदर्शने थांबवत आहोत. लडाखच्या तरुणांमध्ये प्रचंड निराशा आहे. रोजगार मिळत नाही, लोकशाही नाही आणि सहाव्या अनुसूचीचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अशा टोकाच्या घटना घडत आहेत. मात्र हिंसा केल्याने आपले नुकसानच होईल.
मागण्या काय आहेत?
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा
सहाव्या अनुसूचीचा विस्तार
लेह आणि कारगिलसाठी स्वतंत्र लोकसभा जागा
सरकारी नोकरीत स्थानिकांना आरक्षण
काहींची प्रकृती चिंताजनक
सहाव्या अनुसूचीतील तरतुदी आदिवासी लोकसंख्येसाठी शासन व स्वायत्ततेच्या दृष्टीने विशेष अधिकार देतात. गेल्या चार वर्षांत एलएबी व केडीएने सरकारशी अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली. मात्र तोडगा निघालेला नाही. २० सप्टेंबर रोजी केंद्राने नव्या चर्चेसाठी प्रतिनिधींना आमंत्रित केले, त्यानंतर आंदोलन पुन्हा जोरात सुरू झाले. लेह शहरात संध्याकाळपर्यंत तणावाचे सावट होते. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.