Baba Ramdev : "बूस्टर डोसनंतरही कोरोनाचा संसर्ग हे मेडिकल सायन्सचं अपयश"; रामदेव बाबांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:26 IST2022-08-04T17:19:07+5:302022-08-04T17:26:21+5:30
Baba Ramdev And Corona Vaccine : योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा कोरोना लसीवर एक विधान केलं आहे.

Baba Ramdev : "बूस्टर डोसनंतरही कोरोनाचा संसर्ग हे मेडिकल सायन्सचं अपयश"; रामदेव बाबांचं विधान
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,893 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,530 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी (Baba Ramdev) पुन्हा एकदा कोरोना लसीवर (Corona Vaccine) एक विधान केलं आहे. "बूस्टर डोसनंतरही एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर ते मेडिकल सायन्सचं अपयश आहे" असं म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरण कार्यक्रमाकडे देखील त्यांनी बोट दाखवलं आहे.
रामदेव बाबा यांनी "कालांतराने जग औषधी वनस्पतींकडे परत येईल. गिलॉयवर संशोधन करून औषधे बनवली तर भारत जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल" अशी माहिती पतंजलीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली आहे. जेव्हा देश आणि जग कोरोनाच्या युद्धाविरुद्ध कोरोना लसीवर अवलंबून होते तेव्हा बाबा रामदेव यांनी कोरोना लस घेणार नसल्याचं सांगितलं होतं. योग आणि आयुर्वेद या डबल डोसला संरक्षणात्मक कवच असल्याचे सांगून रामदेव यांनी लस घेण्यास नकार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते सतत योगाभ्यास करीत आहे. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका नाही, असेही ते म्हणाले होते.
बाबा रामदेव यांनी दावा केला होता की त्यांना कोरोना लसीची गरज नाही. कोरोना व्हायरसचे कितीही प्रकार आले तरी संसर्गाचा धोका नाही. कारण, योग सांभाळून घेईल, असंही म्हणाले होते. कोरोनावर मात करण्यासाठी लोकांना रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल. जेणेकरून संसर्ग टाळता येईल. परंतु, काही दिवसांनी रामदेव बाबा बॅकफूटवर आले होते आणि लस घेणार असल्याचं म्हटलं होतं.
पारंपरिक भारतीय औषध, सार्वजनिक आरोग्य आणि औद्योगिक दृष्टिकोनांचे आधुनिकीकरण या आंतरराष्ट्रीय परिषदेत पतंजली विद्यापीठाचे रामदेव बाबा म्हणाले की, आपल्या संस्कृतीची ओळख निसर्गातूनच होते. हे आपल्याला समृद्धी आणि आरोग्य देखील देते. आज करोडो लोकांनी आपल्या घरातील बागेत तुळशी, कोरफड आणि गिलॉय यांना स्थान दिले आहे. ज्यामध्ये पूज्य आचार्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षण आणि औषधाच्या नव्या दिशा भारत ठरवेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.