चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:34 IST2025-10-13T17:34:10+5:302025-10-13T17:34:21+5:30
भारत येत्या १५-१७ ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ३,५५० किलोमीटर रेंज असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे.

चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
भारत येत्या १५-१७ ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ३,५५० किलोमीटर रेंज असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीची मर्यादा पाहून चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही धक्का बसला आहे. त्यामुळेच, चीनपाठोपाठ आता अमेरिकेनेही आपले "ओशन टायटन" हे गुप्तचर जहाज हिंद महासागरात पाठवले आहे.
"ओशन टायटन"व्यतिरिक्त चीनचे "युआन वांग-५" देखील मलाक्का सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी हिंद महासागरात पोहोचेल आहे. हे दोन्ही देश भारताची क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी, म्हणजेच भारताचे सामर्थ्य पाहण्यासाठी हिंदी महासागरात पोहोचले आहेत.
अमेरिका आणि भारत संबंधांमध्ये दरी
भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये अलिकडच्या काळात दरी निर्माण झाली आहे. त्यामुळेच, चीनप्रमाणेच अमेरिकाही भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर हेरगिरी करत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताने जारी केला नोटम
भारताने या क्षेपणास्त्र चाचणीबाबत ६ ऑक्टोबर रोजी एक नोटम (हवाई दलाला सूचना) जारी केली. सुरुवातीला या चाचणीसाठी नो-फ्लाय झोन रेंज १,४८० किलोमीटर निश्चित करण्यात आली होती, परंतु दुसऱ्या दिवशी त्याची रेंज २,५२० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर, पुन्हा त्याची रेंज आणखी ३,५५० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. यामुळे क्षेपणास्त्राच्या वापराबद्दल अटकळ बांधली गेली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) यांनी २५ सप्टेंबर रोजी २००० किलोमीटरच्या श्रेणीतील अग्नि-प्राइमची चाचणी केली. त्यामुळे, १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान अग्नि-मालिका क्षेपणास्त्राची चाचणीदेखील होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
भारताची मारक क्षमता ५,००० किमी पर्यंत
भारताच्या अग्नि क्षेपणास्त्र शस्त्रागारात अनेक रेंज आहेत, त्यापैकी सर्वात लांब पल्ल्याची क्षमता ५,००० किमी आहे. अग्नि-५ मध्ये जवळजवळ संपूर्ण आशिया व्यापलेला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि चीनच्या उत्तरेकडील भागांसह, तसेच युरोपच्या काही भागांचा समावेश आहे. देशाच्या दीर्घकालीन सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी हे विकसित केले गेले आहे.
अग्नि-५ क्षेपणास्त्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे MIRV तंत्रज्ञान. MIRV म्हणजे मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर मारा करता येतो.