गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर मुघल बादशाहा औरंगजेब याने केलेल्या अत्याचारांचं भेदकपणे चित्रिकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून औरंगजेबाविषयी कमालीचा संताप व्यक्त होत आहे. असं असलं तरी काही जणांकडून मात्र औरंगजेब बादशाहा हा कसा महान होता, याची उदाहरणं दिली जात आहेत. काल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक केल्यानंतर आता काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनीही औरंगजेब बादशाहचं गुणगान केलं आहे. औरंगजेब हा कुणी आक्रमक नव्हता, तर अखंड भारताला आकार देणारा बादशाहा होता, असा दावा इम्रान मसूद यांनी केला आहे. तसेच एक चित्रपट तयार करून कुणी इतिहास मिटवू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी छावा चित्रपटाला उद्देशून लगावला आहे.
इम्रान मसून औरंगजेब बादशाहाची महानता वर्णन करताना म्हणाले की, जे इतिहासात लिहिले आहे ते मिटवता येणार नाही. लोकांना योग्य ज्ञान मिळालं पाहिजे. औरंगजेब हा ४९ वर्षे या देशाचा बादशहा राहिला आहे. आताताई कसा काय असू शकतो, त्याच्या काळात जीडीपी किती होता. औरंगजेबा हा भारताचा बादशाहा होता. त्याच्या काळात कैलास मानसरोवरावर विजय मिळवला गेला होता. बर्मापर्यंतचा अखंड भारत त्यानेच निर्माण केला होता, असेही इम्रान मसूद म्हणाले.
आज मुघलांचे वंशज हे भांडीकुंडी घासून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. मुघल इथेच जन्मले आणि याच मातीत मिळाले. उलट इंग्रजांनी भारताला लुटले आणि निघून गेले. बहादूरशाह जफर याच्या दोन मुलांनी आत्मसमर्पण केलं नाही, त्यामुळे त्यांची हत्या केली गेली. भाजपा पसरवत असलेला द्वेष देशाला कुठे घेऊन जाईल कुणास ठावूक. द्वेषाच्या राजकारणामुळे देशाचं नुकसानच होणार आहे. कारण २५ कोटी लोकांना तुम्ही एका बाजूला टाकू शकत नाही, असेही इम्रान मसूद यांनी सुनावले.