"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:14 IST2025-10-18T10:38:49+5:302025-10-18T11:14:15+5:30
Priyanka Chaturvedi on Afghanistan Attack: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी शुक्रवारी परस्पर संमतीने ४८ ...

"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
Priyanka Chaturvedi on Afghanistan Attack: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी शुक्रवारी परस्पर संमतीने ४८ तासांचा युद्धविराम वाढवण्यावर सहमती दर्शवली. पण काही तासांनंतरच, तालिबानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्याचा आरोप केला. पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले केले ज्यात तीन अफगाण क्रिकेटपटूही मारले गेले. यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या आगामी मालिकेत सहभागी न होण्याचा निर्णय अफगाणिस्तानने घेतला आहे. यावरुनच ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अफगाणिस्तानकडून शिकण्याचा सल्ला देत केंद्र सरकार आणि बीसीसीआयला टोला लगावला आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडून केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू मारले गेल्यामुळे, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धची रावळपिंडी आणि लाहोर येथे होणारी टी-२० मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकारला खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे याचे धडे अफगाणिस्तानकडून घेण्याचा सल्ला दिला आहे.
या घटनेनंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला भ्याड म्हटले आणि त्यांच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देखील आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "बीसीसीआय आणि भारत सरकारने खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे, याचा धडा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून घ्यावा," असे चतुर्वेदी म्हणाल्या.
Pakistan establishment is made up of a bunch of cowards who thrive on the blood of their innocent victims and get thrashed at the borders. Shame on them.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) October 18, 2025
Good to see Afghanistan Cricket Board call off their series matches with Pakistan, maybe BCCI and GoI can take tips on how to… https://t.co/VzAvFcUOwi
चतुर्वेदी यांनी श्रीलंका संघालाही या मालिकेतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे. २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची आठवण करून देत, त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात अन्य आशियाई देशांनी एकत्र उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड' केल्याचा आरोप केला होता. मात्र, भारताने स्पर्धेत पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. मात्र पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला होता.