ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:14 IST2025-08-08T17:13:16+5:302025-08-08T17:14:26+5:30
२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले.

ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
मुंबई - लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांनी पुराव्यासह भाजपा आणि निवडणूक आयोग हातमिळवणी करत मतांची चोरी करत असल्याचा दावा केला. त्यात दुबार मतदार यादीचा उल्लेख करत उदाहरण म्हणून राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव हे नाव पुढे आणले. आदित्य श्रीवास्तव मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथे मतदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यावर आता आदित्य श्रीवास्तव समोर आला आहे.
आदित्य श्रीवास्तव म्हणाला की, मी उत्तर प्रदेशातील लखनौ इथला रहिवासी आहे. २०१६ पासून मी मुंबईत राहत होतो. २०२१ साली बंगळुरू येथे शिफ्ट झालो. कोरोना काळात मुंबई सोडून बंगळुरू येथे राहण्यास आलो. जेव्हा मी मुंबईत नोकरी करत होतो तेव्हा मी तिथला मतदार होतो. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मी मुंबईत मतदान केले होते. मी आधी लखनौ येथे राहायला होतो. तिथून मतदान कार्ड मुंबईत ट्रान्सफर केले. २०१७-१८ या काळात मी मतदार म्हणून मुंबईत नोंदणी केली. त्यामुळे माझा मतदार क्रमांक तोच आहे असं सांगत राहुल गांधी यांनी माझी माहिती सार्वजनिक करायला नको होती अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. इंडिया टीव्हीशी त्यांनी फोनवरून संवाद साधला.
LIVE: Press Conference - #VoteChori | Indira Bhawan, New Delhi https://t.co/BlZwacZpto
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2025
तसेच २०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला. मुंबई सोडल्यानंतर मी पुन्हा तिथे मतदान करण्यासाठी गेलो नाही. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत माझी माहिती नको द्यायला हवी होती. त्यामुळे माझ्या कुटुंबाची, वडिलांची सर्व माहिती समोर आली आहे. मी मतदान कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म भरला होता. माझ्याकडे नवीन मतदार कार्ड आले. मी त्याच नंबरचे कार्ड ट्रान्सफर केले होते. जर माझे मतदार कार्ड ट्रान्सफर झाले असेल तर जुने हटवण्यात आले आहे असंही आदित्य श्रीवास्तव यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलं असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी यासंदर्भात आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या इपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीचं छायाचित्र आणि इपिक क्रमांकाही दाखवला होता. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.