India Pakistan News: पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जम्मूमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेची माहिती दिली. राज कुमार थापा असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू आणि काश्मिरातील गावांना लक्ष्य केले जात आहे. मागील दोन दिवसांपासून पाकिस्तान ड्रोन्स, मिसाईल हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडण्यात आले. दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान लष्कराकडून उखळी तोफांचे हल्ले गावांवर केले जात असून, यात आता एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
राज कुमार थापा यांचा मृत्यू
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अतिरिक्त आयुक्त राज कुमार थापा यांचा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली. एक हादरवून टाकणारी बातमी राजौरीतून आली आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याला गमावले आहे. कालच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत हजर होते, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.
राजौरीमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानावरच पाकिस्तानकडून उखळी तोफा डागण्यात आल्या. यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे खूप मोठे नुकसान आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारताने चार हवाई तळावर ६ मिसाईल्स डागल्या -पाकिस्तान
दरम्यान, ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ले केले. ते हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानने फतेह १ मिसाईल्स डागली. ही मिसाईलही हवेतच निष्क्रिय करण्यात आली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानातील काही ठिकाणी मोठे स्फोट झाले. पाकिस्तानच्या चार हवाई तळाजवळ हे स्फोट झाले आहेत. पाकिस्तानने असा दावा केला आहे की, भारताने ६ बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्या आहेत.