"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:21 IST2025-02-25T15:11:54+5:302025-02-25T15:21:31+5:30
भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नसल्याचे म्हणत अभिनेत्रा रंजना नचियार यांनी राजीनामा दिला.

"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा
Ranjana Nachiyar Resigns From BJP:तामिळनाडू आणि केंद्र सरकारमधला भाषिक वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याच्या नियमावरून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये सध्या जोरदार वाद सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी तीन भाषा धोरणाची अंमलबजावणी न केल्याबद्दल केंद्राने आपल्याला धमकावल्याचा आरोप केला होता. केंद्राने आमच्यावर हिंदी भाषा थोपवत निधी थांबवून ठेवला होता असाही आरोप तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र आता या तीन भाषा शिकवण्याच्या धोरणाला भाजपमधूनच विरोध सुरु झाला आहे. तमिळनाडू राज्यावर केलेल्या दुर्लक्षाचा राग व्यक्त करत दाक्षिणात्य अभिनेत्री रंजना नचियार यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या रंजना नचियार यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तीन भाषा लादणे चुकीचे असल्याचे म्हणत भाजपच्या तामिळनाडू कला आणि सांस्कृतिक शाखेच्या राज्य सचिव रंजना नचियार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राजीनाम्यामागे त्रिभाषा धोरण लागू करण्याचे कारण असल्याचे रंजना नचियार यांनी म्हटलं. राजकारणी झालेल्या रंजना नचियार या गेल्या आठ वर्षांपासून भाजपसोबत होत्या.
भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नाहीत - रंजना नचियार
"मी राष्ट्रवाद आणि समर्पणाच्या भावनेने पक्षात प्रवेश केला होता. पण पक्षाचा वाढता 'संकुचित दृष्टीकोन' आणि तामिळनाडूकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे माझ्यासमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपच्या केंद्रीकरणाच्या धोरणांमुळे तामिळनाडूची संस्कृती नष्ट होत आहे. त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीमुळे तमिळ भाषिक लोकांच्या भाषिक आणि सांस्कृतिक अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. माझ्यासाठी तमिळनाडूची समृद्धी ही संपूर्ण देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नाहीत, असं रंजना नचियार यांनी आपल्या पत्रात म्हटलं.
भाजप तमिळ अस्मितेचा आदर करत नाही
"भाजप राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवाद आणि धर्माचा वापर करत असून तमिळ अस्मितेचा आदर करत नाहीये. जेव्हा लोक भाजपबाबात विचार करतात तेव्हा त्यांना हा राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रहिताचे रक्षण करणारा पक्ष किंवा धर्माचे रक्षण करणारा पक्ष वाटत. पण मी पाहतेय की राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय ओळख आणि धार्मिक भावना कशा हाताळल्या जात आहेत. त्यामुळे मला वाटते की मी आता यांच्यासोबत राहू शकत नाही," असंही रंजना नचियार म्हणाल्या.
स्वतःचा पक्ष सुरू करणार
"मी माझ्यासाठी एक चळवळ, स्वतःसाठी एक संघटना, महिलांच्या प्रगतीला प्राधान्य देणारे नेतृत्व उभारण्याच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला आहे. ज्यांनी मला संधी आणि पदे दिली आणि ज्यांनी माझ्या वाढीसाठी आणि प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले त्यांचा मी सदैव ऋणी राहीन आणि मी कृतज्ञ आहे. माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या, माझ्यासोबत काम करणाऱ्या आणि माझी काळजी घेतलेल्या सर्व बंधू-भगिनींचे खूप खूप आभार," असं रंजना नचियार यांनी म्हटलं