सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 05:45 IST2025-08-23T05:44:14+5:302025-08-23T05:45:14+5:30

नसबंदी-लसीकरण केल्यावरच कुत्र्यांना सोडा; ११ ऑगस्टच्या आदेशात केला बदल

Action will be taken against those who feed stray dogs in public places; Supreme Court orders | सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील मोकाट कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याच्या महापालिकेने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नवा आदेश दिला. या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या लसीकरणानंतरच सोडायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी अशा कुत्र्यांना मुक्त सोडायलाच नको, त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास मज्जाव करून यासाठी विशेष झोन तयार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

निकालानंतर पशुप्रेमींत आनंद

मोकाट कुत्र्यांना मुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पशुप्रेमींनी दिल्लीत ‘जंतर-मंतर’वर आनंद साजरा केला. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया’ने (पेटा ) या निकालाचे स्वागत करून या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचा आग्रह केला. लोकांनी पाळीव प्राणी खरेदी करण्यापेक्षा अशा मोकाट मुक्या प्राणांना दत्तक घेण्याचे आवाहनही या संघटनेने केले आहे. ‘ह्यूमेन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स इंडिया’च्या महासंचालिका आलोकपर्णा सेनगुप्ता यांनीही या निकालाचे स्वागत केले आहे. 

देशभर लागू होणार आदेश

न्या. विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संदीप मेहता व न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने आता या प्रकरणाची व्याप्ती दिल्ली-एनसीआरच्या बाहेरपर्यंत वाढवली असून, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना यात पक्षकार करावे, असे निर्देश दिले आहेत. यासंबंधी देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व दावे सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. आता मोकाट कुत्र्यांसंबंधीचे आदेश देशभर लागू होतील.

...तर होईल कठोर कारवाई

निश्चित केलेली ठिकाणे सोडून सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना कुणी खाऊ घालत असेल, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.   मोकाट कुत्र्यांची संख्या देशभर अत्यंत झपाट्याने वाढत चालली आहे. नसबंदीमुळे यावर नियंत्रण राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

डेहराडून, लखनाै ठरले आदर्श

न्यायालयाने कुत्र्यांच्या नसबंदीचे उदाहरण देताना सांगितले, डेहराडून व लखनाै या शहरांत मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय झाला आणि यासाठी कठोर पावले उचलली गेली होती. परिणामी कुत्र्यांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले. 

Web Title: Action will be taken against those who feed stray dogs in public places; Supreme Court orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.