दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:23 IST2025-11-13T21:10:39+5:302025-11-13T21:23:20+5:30
भारतीय विद्यापीठांच्या संघटनेने अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. संघटनेने अधिकृत पत्राद्वारे विद्यापीठाला या निर्णयाची माहिती दिली.

दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. परिणामी, विद्यापीठावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले. असोसिएशनने एका अधिकृत पत्रात हा निर्णय जाहीर केला. या पत्राद्वारे, असोसिएशनने अल-फलाहला आपला लोगो काढून टाकण्याचे आणि असोसिएशनचे नाव कोणत्याही स्वरूपात वापरू नये असे निर्देश दिले.
'विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले जात आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या उपनियमांनुसार, सर्व विद्यापीठे चांगल्या स्थितीत राहिल्यास त्यांना सदस्य मानले जाईल, असे असोसिएशनने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हरयाणातील अल-फलाह विद्यापीठ चांगल्या स्थितीत दिसत नाही. त्यानुसार, हरयाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाला दिलेले एआययू सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत आहे, असंही यामध्ये म्हटले आहे.
"विद्यापीठ एआययूचे नाव किंवा लोगो वापरू शकत नाही. शिवाय, हे कळविण्यात येते की अल-फलाह विद्यापीठ त्यांच्या कोणत्याही उपक्रमात एआययूचे नाव किंवा लोगो वापरण्यास अधिकृत नाही आणि एआययूचा लोगो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून त्वरित काढून टाकावा", असंही नॅकने म्हटले आहे.