"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:13 IST2025-11-01T18:12:57+5:302025-11-01T18:13:20+5:30
"जी व्यक्ती आरएसएसबद्दल अपशब्द वापरते, ती राष्ट्रभक्त असू शकत नाही..."

"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
काँग्रेसचे माजी नेते तथा अध्यात्मिक गुरु आचार्य प्रमोद कृष्णम पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांने चर्चेत आले आहेत. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. त्यांनी राहुल गांधी यांना ‘बदतमीजों का बादशाह’, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि हिंदू धर्मासंदर्भातही त्यांनी भाष्य केले.
असम विधानसभेचे उपाध्यक्ष नुमल मोमिन यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, राहुल गांधी ना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतात, ना आरएसएसचा, ना संविधानाचा आदर करतात. राहुल गांधींचे मूलभूत संस्कारच चुकीचे आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात असभ्यता दिसून येते. ते नेहमीच इतरांचा अनादर करतात. एवढेच नाही तर, राहुल गांधी ‘बदतमीजां'चा बादशाह आहेत,” असेही ते म्हणाले.
आरएसएससंदर्भातील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिष्ठ आणि पराक्रमी लोकांचा संघ आहे. या संस्थेचा प्रत्येक क्षण राष्ट्रसेवेसाठी अर्पण असतो. जी व्यक्ती आरएसएसबद्दल अपशब्द वापरते, ती राष्ट्रभक्त असू शकत नाही. एवढेच नाही तर, काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले, काँग्रेसमध्ये आज राष्ट्रविरोधकांची जमात जमा झाली आहे, जी राष्ट्रप्रेमी संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याचे पाप करते.
याशिवाय, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या विधानाचा संदर्भ देत आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “स्वर्गात स्थान फक्त हिंदूंनाच मिळेल.” हिंदू धर्माशिवाय कुणालाही परलोकात जागा मिळणार नाही. त्यांच्या या विधानाने धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.