नवी दिल्ली : धुळवड संपली असली तर आम आदमी पार्टीतील (आप) चिखलफेक आणि कुरघोडीचे राजकारण मात्र शमायला तयार नाही. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोन नेत्यांना राजकीय व्यवहार समितीतून हटविल्याच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविल्याने पक्षातील एका गटाने आपल्याला लक्ष्य बनविले असल्याचा आणखी एक आरोप आपचे ज्येष्ठ नेते मयांक गांधी यांनी शनिवारी केला. आपल्याला पक्ष सोडण्यास भाग पाडले जाऊ शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.सोशल मीडियावर आपल्याला पक्षविरोधी आणि एकेविरोधी (अरविंद केजरीवाल) सिद्ध करण्याची मोहीम सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाची बंदी धुडकावून गांधी यांनी ब्लॉगवर आपली भूमिका स्पष्ट केली. यादव आणि भूषण यांनाही अपमानित करून बाहेर काढण्याची मोर्चेबांधणी सुरू होती. परंतु पक्षाबाहेर न पडून या दोघांनी त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. मलाही किंमत चुकवावी लागू शकते. दिल्लीत निर्णय घेणाऱ्या एका छोट्या गटाने मला बीबीएममधून यापूर्वीच बाहेर केले आहे. आशिष खेतान आणि इतरांकडून आता माझ्यावर हल्लाबोल सुरू झाला आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे. बुधवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते अनुपस्थित होते. काही लोक ब्लॉग लिहितात, काही मुलाखती देतात तर काही लोक इतिहास निर्माण करतात, अशी टीका खेतान यांनी गांधी यांच्यावर केली होती.
‘आप’मधील चिखलफेक सुरूच
By admin | Updated: March 8, 2015 02:51 IST