आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 06:07 IST2025-10-20T06:07:15+5:302025-10-20T06:07:36+5:30
दिल्लीतील न्यायालयाने एका आरोपीचा तब्बल ५०० पानांचा जामीन अर्ज फारच प्रदीर्घ आणि क्लिष्ट असल्याचे सांगत फेटाळला.

आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने शुक्रवारी एका आरोपीचा तब्बल ५०० पानांचा जामीन अर्ज फारच प्रदीर्घ आणि क्लिष्ट असल्याचे सांगत फेटाळला. विशेष पॉक्सो न्यायाधीश रमेश कुमार यांनी हा अर्ज फेटाळताना स्पष्ट केले की, इतक्या मोठ्या अर्जावर निर्णय देण्यात न्यायालयाचा बहुमोल वेळ वाया जाईल.
कल्याणपुरी पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी बंद दरवाजामागे झाली. याचिकेवर सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी निरीक्षण केले की, आरोपीच्या वकिलाने सुमारे ५०० पानांचा अर्ज तयार केला आहे.
न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, अशा विस्तृत अर्जावर विचार करणे शक्य नाही. न्यायालयावर आधीपासूनच जुन्या प्रकरणांचा ताण आहे. इतक्या मोठ्या अर्जावर निर्णय देण्यासाठी मौल्यवान न्यायिक वेळ खर्ची पडेल. जज रमेश कुमार यांनी अर्जदाराच्या वकिलाला पुढील वेळी संक्षिप्त आणि नेमक्या स्वरूपातील जामीन अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे न्यायालयाने सध्याचा अर्ज फेटाळत आरोपीस नवीन जामीन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली.