उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 13:31 IST2023-06-22T13:26:20+5:302023-06-22T13:31:45+5:30
Accident In Uttarakhand: उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुनस्यारीतील होकरा परिसरामध्ये भाविकांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुनस्यारीतील होकरा परिसरामध्ये भाविकांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण बेपत्ता झाले आहेत. सध्या बचाव कार्यासाठी पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ही जीप रस्त्यावरून सुमारे ६०० मीटर खोल दरीमध्ये कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व भाविक बागेश्वर येथील शामा येथून होकरा येथे मंदिर दर्शनासाठी जात होते. तत्पूर्वीच त्यांच्या जीपला अपघात होऊन ती दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर ग्रामस्थांची गर्दी जमली. तसेच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आता बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पिथौरागड आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मसुरी-होकरा मार्गावर सप्लाय गोदामाजवळ एका वाहनाला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळासाठी पोलीस फोर्स नाचनी, एसडीआरएफ, रुग्णवाहिका आणि महसूल विभागाचे पथख रवाना झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती ह्या बागेश्वर तालुक्यातील कपकोट, शामा आणि भनार येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर कपकोट येथून एसडीआरएफचं पथक आणि पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले.