पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 07:56 IST2024-04-29T07:55:29+5:302024-04-29T07:56:01+5:30
Accident in Chhattisgarh: छत्तीसगडमधील बेमेतरा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझदा कारला पिकअप व्हॅनने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. तर या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत.

पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी
छत्तीसगडमधील बेमेतरा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझदा कारला पिकअप व्हॅनने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. तर या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात बेमेतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कठिया गावातील पेट्रोल पंपाजवळ झाला. येथे महामार्गाच्या बाजूला एक माझदा कार उभी होती. तिला प्रवाशांनी भरलेल्या पिकअप व्हॅनने धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. हे सर्व प्रवासी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन तिरैया गावातून पथर्रा गावाकडे परतत होते.
दरम्यान, रविवारी असाच एक मोठा अपघात उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे झाला होता. एका वेगवान ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते.
भरधाव ट्रक चालकाच्या दिशेने बसला घासून गेला होता. त्यामुळे त्या बाजूने बसलेल्या ६ जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक बरेलीमधील होता. तर बस ही उन्नावहून हरदोईच्या दिशेने जात होता. तेव्हाच हा अपघात झाला.