Abhishek Banerjee has sent a defamation notice to Prime Minister Narendra Modi | ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस 
ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस 

कोलकाता -  यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रसंगही अनेकदा घडले. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारसभांदरम्यान ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर  आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या होत्या. दरम्यान, मोदींनी 15 मे रोजी डायमंड हार्बर येथील प्रचारसभेमध्ये केलेल्या आरोपांप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 पश्चिम बंगालमध्ये यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढाई झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंसक हाणामाऱ्याही झाल्या होत्या. विशेषत: अमित शहा यांच्या रोड शो नंतर कोलकात्यामध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचे आदेश दिले होते. आता पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 9 मतदारसंघांसाठी रविवारी मतदान होणार आहे.  


Web Title: Abhishek Banerjee has sent a defamation notice to Prime Minister Narendra Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.