गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:22 IST2025-05-31T15:22:09+5:302025-05-31T15:22:27+5:30
Abbas Ansari Hate Speech case: मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी केपी सिंह यांनी ही शिक्षा सुनावली.

गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदारपुत्राला दोन वर्षांची शिक्षा; आमदारकी गेली, प्रक्षोभक वक्तव्य भोवले
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला प्रक्षोभक वक्तव्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अन्सारीची आमदारकी धोक्यात आली आहे. याचबरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी केपी सिंह यांनी ही शिक्षा सुनावली. २०२२ च्या उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता. अब्बासने अधिकाऱ्यांशी हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच प्रकरणात सहआरोपी मन्सूर अन्सारी याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्बास हा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा आमदार आहे. मऊच्या एमपी-एमएलए कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मऊ कोतवालीचे तत्कालीन उपनिरीक्षक गंगाराम बिंद यांनी एफआयआर दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषण आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणातील पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, सीजेएम डॉ. केपी सिंह यांनी निर्णयासाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली होती.
गँगस्टर मुख्तार अन्सारीचा बांदा मेडिकल कॉलेजमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. दरम्यान, अब्बास अन्सारीची आमदारकी रद्द करण्यात आल्याचे वृत्त येत आहे. या निर्णयाविरोधात अब्बास वरच्या कोर्टात दाद मागू शकतो. वरच्या कोर्टाने आदेश दिल्यास अब्बासला आमदारकी परत मिळू शकते. मुख्तार अन्सारीचा राजकीय वारसा पुढे नेत असल्याने आमदारकी वाचविण्यासाठी अब्बास कोर्टात जाण्याची शक्यता आहे.