भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:16 IST2025-11-02T13:15:48+5:302025-11-02T13:16:48+5:30
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. पंजाबच्या लुधियाना येथील ११ वर्षीय आरवसोबत असंच घडलं आहे.

फोटो - ndtv.in
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. पंजाबच्या लुधियाना येथील ११ वर्षीय आरवसोबत असंच घडलं आहे. दिवाळीपूर्वी खरेदी केलेल्या पंजाब स्टेट डियर दिवाळी बंपर लॉटरीने या लहान मुलाला थेट करोडपती बनवलं आहे. आरवला तब्बल १ कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाला फार आनंद झाला.
आरव मूळचा होशियारपूरचा रहिवासी आहे आणि सध्या तो त्याचे काका करणसोबत लुधियानातील हैबोवाल येथे राहतो. करण प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. काही दिवसांपूर्वी आरव त्याच्या काकासोबत बाजारात गेला. लॉटरीच्या दुकानात गर्दी पाहून त्याने तिकीट खरेदी करण्याचा हट्ट केला. सुरुवातीला काकाने नकार दिला, परंतु आरवच्या हट्टीपणामुळे तो गांधी ब्रदर्सच्या दुकानातून शेवटचे तिकीट खरेदी करण्यास राजी झाला.
शुक्रवारी रात्री यूट्यूबवर लॉटरी ड्रॉचा रिझल्ट आला. करणने तिकीट नंबर टाकला आणि आरवच्या नावाने खरेदी केलेल्या तिकिटावर १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याचं समजलं. हे ऐकून कुटुंब आनंदित झालं. दुकानाबाहेर ढोल वाजवले गेले आणि मिठाई वाटण्यात आली. लोकांनी आरवचं अभिनंदन केलं आहे.
पंजाब राज्य डियर दिवाळी बंपर २०२५ च्या लॉटरीत एकूण ३६ कोटी १४ लाख ७८ हजार रुपये वाटण्यात आले. ११ कोटी रुपयांचं पहिले बक्षीस भटिंडा येथे विकल्या गेलेल्या तिकीट नंबर A ४३८५८६ ने जिंकलं, या विजेत्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही. या बंपर लॉटरीत एकूण १८,८४,९३९ तिकिटं विकली गेली.
लॉटरी विभागाच्या नियमांनुसार, निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत विजेत्यांनी चंदीगड येथील संचालक कार्यालयात दावा करणं आवश्यक आहे. बक्षीस रक्कमेचं वाटप केल्यानंतर टॅक्स (TDS) कापला जाईल.