तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:36 IST2026-04-03T12:36:30+5:302026-04-03T12:36:58+5:30
AAP vs Raghav Chadha News: आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना पदावरून हटवले आहे. सौरभ भारद्वाज आणि अनुराग ढांडा यांनी चड्ढा यांच्यावर मोदींना घाबरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप...
आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. पक्षाचे हायप्रोफाईल खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यात आले असून. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज आणि राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनुराग ढांडा यांनी चड्ढा यांच्यावर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. "संसदेत देश वाचवायचा सोडून विमानतळावर समोसे स्वस्त करण्याच्या गप्पा मारता का?" अशा शब्दांत चड्ढा यांची फिरकी घेण्यात आली आहे.
अनुराग ढांडा यांनी थेट आरोप केला की, "राघव, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींना घाबरत आहात. जो घाबरला तो देशासाठी काय लढणार?" संसदेत पक्षाला मिळणारा मर्यादित वेळ देशहिताच्या मुद्द्यांऐवजी "विमानतळ कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करणे" यांसारख्या फालतू कामांसाठी वापरला जात असल्याचा टोला ढांडा यांनी लगावला.
सह्या करण्यास नकार
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास चड्ढा यांनी नकार दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. जेव्हा 'आप'चे सर्व खासदार सभात्याग करतात, तेव्हा चड्ढा मोदींच्या उपस्थितीत सभागृहातच बसून राहतात, असा ठपकाही भारद्वाज यांनी ठेवला. तसेच गुजरातमध्ये आप कार्यकर्त्यांच्या अटकेवरही चड्ढा हे काहीच बोलले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
पक्षाची मोठी कारवाई आणि राघव यांचे प्रत्युत्तर
आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव चड्ढा यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. तसेच, पक्षाच्या कोट्यातून चड्ढा यांना बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकारानंतर राघव चड्ढा यांनी एक व्हिडिओ जारी करत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका.".
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आणि सुटकेनंतर पक्षात मोठे फेरबदल होत आहेत. संसदेतील बनावट सह्यांच्या प्रकरणानंतर राघव चड्ढा हे बरेच शांत झालेले आहेत. राघव चड्ढा हे बराच काळ लंडनमध्ये होते आणि त्यानंतरही ते पक्षात सक्रिय दिसत नव्हते. आता पक्षाने घेतलेली ही भूमिका चड्ढा यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.