आपकडून ताहिर हुसेनची पुन्हा पाठराखण; मुस्लिम असल्यानेच कारवाई केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 18:08 IST2020-03-07T18:07:02+5:302020-03-07T18:08:51+5:30
आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली हिंसाचारामध्ये नुकतीच अटक करण्यात आलेल्या ताहिरवर तो मुस्लिम असल्यानेच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे.

आपकडून ताहिर हुसेनची पुन्हा पाठराखण; मुस्लिम असल्यानेच कारवाई केल्याचा आरोप
नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारातील आरोपी आणि आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आपने सुरुवातीला ताहिरचे नाव जाणूनबुजून गोवण्याचा आल्याचा आरोप केला होता. मात्र, त्याच्या घरातूनच पेट्रोल, अॅसिड बॉम्ब फेक आणि आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये ताहिरचा हात असल्याचे आरोप झाल्यावर आपने ताहिरला चौकशी होईस्तोवर पक्षातून निलंबित केले होते. मात्र, पुन्हा आपचा खरा चेहरा उघड झाला आहे.
आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली हिंसाचारामध्ये नुकतीच अटक करण्यात आलेल्या ताहिरवर तो मुस्लिम असल्यानेच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे. आज हिंदुस्थानमध्ये सर्वात मोठा गुन्हा हा मुस्लिम असल्याचा आहे, असे वाटते. पुढील काळात दिल्ली हिंसाचार ताहिरनेच घडवून आणल्याचेही सिध्द केले जाऊ शकते, असा आरोप खान यांनी केला आहे.
नागरिकता संशोधन कायदा (CAA) विरोधात जामियानगरमध्ये हिंसाचार झाला होता. यामध्ये अमानतुल्लाह खानही आरोपी आहेत. त्यांनी आता दिल्ली हिंसाचाराचा आरोपी ताहिर हुसेनला वाचविण्यासाठी धर्माचे कार्ड खेळले आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आपच्या निलंबित नगरसेवकाकडून लायसन्स पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. हे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. याद्वारे या पिस्तूलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या का याचा तपास केला जाणार आहे. शिवाय ताहिरचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख
पुलवामा हल्ल्याचे अॅमेझॉन कनेक्शन; ऑर्डर मिळताच पाठविले 'बॉम्ब' बनविण्याचे साहित्य
ताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे अॅसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही.