‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 14:00 IST2023-06-25T13:59:58+5:302023-06-25T14:00:56+5:30
AAP On Rahul Gandhi : महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती.

‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज
केंद्र सरकारच्या दिल्ली अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचे समर्थन मागत असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे. काँग्रेसनेराहुल गांधी यांना तिसऱ्या वेळीही नेता म्हणून प्रोजेक्ट करू नये, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आपच्या प्रवक्ता प्रियंका कक्कड यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.
ट्विटमध्ये कक्कड म्हणाल्या, “जर देश वाचवायचा असेल तर, सर्वप्रथम काँग्रेसने जाहीर करायला हवे की, ते तिसऱ्यांदाही राहुल गांधींवर डाव लावणार नाही आणि यासाठी विरोधी पक्षांवरही दबाव टाकणार नाही. देश हितासाठी हे संविधान वाचविण्यापेक्षाही महत्वाचे आहे.” प्रियंका कक्कड यांनी हे ट्विट पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर केले आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती.
विरोधकांच्या बैठकीत उपस्थित झाला दिल्ली अध्यादेशाचा मुद्दा -
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२३ जून) पाटणा येथे भाजपच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकिला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
अगर देश बचाना है तो सबसे पहले कांग्रेस को बोल देना चाहिए की वो तीसरी बार भी Rahul Gandhi पर दाव नहीं लगायेंगे और समूचे विपक्ष पर ये दबाव नहीं डालेंगे। देश हित में ये संविधान बचाने से भी ऊपर है।
— Priyanka Kakkar (@PKakkar_) June 24, 2023
बैठकीत काय म्हणाले होते केजरीवाल? -
आम आदमी पक्षाच्या (आप) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना जेव्हा बैठकीत बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम अध्यादेशावर भाष्य केले आणि त्यावर पाठिंबा मागितला. काँग्रेसने या अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे मतभेद आणि मनभेद दूर व्हावेत यासाठी अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींना चहापानावर भेटण्याची विनंती केली, पण राहुल गांधी यांनी नाकार दिला होता.