दिल्लीतील नरेला येथे शनिवारी सकाळी आणखी एका तरुणाच्या हत्येनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. दिल्लीतील जनता किती दिवस अशा घटना सहन करणार आहे? असा सवाल त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला विचारला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "दिल्लीमध्ये आणखी एक वेदनादायक हत्या. दिल्लीत रक्त वाहत आहे आणि केंद्रातील भाजपा सरकार हातावर हात ठेवून गप्प बसली आहे. दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"
अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत. आता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दिल्लीतील जनतेने केंद्र आणि भाजपावर एकच जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेची आहे. ती पूर्ण करण्यातही भाजपा अपयशी ठरली असा आरोप केला आहे. दिल्लीत दररोज खून, दरोडा, लुटमारीच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील महिलांसह सर्वांनाच असुरक्षित वाटत आहे. दिल्ली पोलीस काहीच करू शकत नाहीत असंही म्हटलं.
दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवण्याच्या धमकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुन्हेगार आणि धमकावणाऱ्यांचं मनोबल उंचावले आहे. शाळांना बॉम्बची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अद्याप पकडण्यात आलेलं नाही. दिल्लीतील जनतेला सुरक्षा देण्यात अमित शाह अपयशी ठरले आहेत. आता गृहमंत्र्यांनी दिल्लीतील जनतेमध्ये येऊन उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे.