पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:01 IST2025-11-13T15:00:40+5:302025-11-13T15:01:18+5:30
Aadhar Card: UIDAI आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली.

पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Aadhar Card:पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यात तब्बल 34 लाख आधार कार्ड धारक ‘मृत’ असल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) निवडणूक आयोगाला कळवले आहे. ही माहिती आधार योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीवर आधारित आहे.
UIDAI आणि निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
UIDAI आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी एकत्रित बैठक घेतली. यावेळी UIDAI ने सांगितले की, सुमारे 13 लाख नागरिक असे होते, ज्यांच्याकडे कधीच आधार कार्ड नव्हते, पण त्यांच्या मृत्यूची नोंद आता झाली आहे. ही बैठक सध्या राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झाली. या मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांचे पुनरावलोकन आणि दुरुस्ती केली जात आहे.
बनावट आणि मृत मतदारांची माहिती समोर येणार
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आयोगाला बनावट मतदार, मृत मतदार, अनुपस्थित मतदार आणि मतदार याद्यांमधील डुप्लिकेट नावे यासंबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. UIDAI कडून मिळालेली ही आकडेवारी अशा नावांची ओळख करुन त्यांना यादीतून काढण्यासाठी मदत करेल. बँकांनीही अशा खात्यांची माहिती दिली आहे, जिथे अनेक वर्षांपासून KYC अपडेट झालेले नाही. या माध्यमातून मृत व्यक्तींची ओळख पटवून मतदार याद्यांमधील विसंगती दूर केली जात आहे.”
SIR मोहिमेची प्रगती
सध्या संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मृत व बनावट मतदार ओळखण्यासाठी SIR मोहिम जोमात सुरू आहे. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन 2025 च्या मतदार यादीच्या आधारे गणना फॉर्म वितरित करत आहेत. त्यानंतर अर्जदारांनी दिलेली माहिती 2002 च्या मतदार यादीशी तुलना केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, बुधवार रात्री 8 वाजेपर्यंत राज्यात 6.98 कोटी गणना फॉर्म वितरित झाले आहेत. प्राथमिक यादीत जर बनावट, मृत किंवा डुप्लिकेट नावे आढळली, तर संबंधित BLO वर शिस्तभंगात्मक कारवाई होऊ शकते.