भाजपा खासदाराच्या सुनेच्या कारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली असून, या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी खासदारांच्या घराबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन करत रास्ता रोको केला. २ एप्रिल रोजी मध्य प्रदेशमधील सीधी लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार डॉ. राजेश मिश्रा यांची सून डॉ. बीना मिश्रा यांच्या कारची धडक एका स्कूटीला बसली होती. त्यात स्कूटीचालक अनिल द्विवेदी हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारांदरम्यान, या तरुणाचा रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी तीव्र आंदोलन केले.
मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार अपघात झालेली कार (एमपी १७, जेई ५६१३) खासदाराची सून चालवत होती. मात्र एफआयआरमध्ये ड्रायव्हरचं नाव घालण्यात आलं आहे. तर अपघात झालेली कार भाजपा खासदार राजेश मिश्रा यांचे पुत्र डॉ. अनुप मिश्रा यांच्या नावावर आहे. या प्रकरणात जोपर्यंत भाजपा खासदारांच्या सुनेविरोधात एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खासदारांच्या घरासमोरून हटवणार नाही, अशी भूमिका मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
डीएसपी गायत्री तिवारी यांनी सांगितले की, २ एप्रिल रोजी हा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिल द्विवेदी या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल झालेला आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. आता जे आरोप करण्यात आले आहेत, त्यांचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल.