नवविवाहितेचा कट! पार्लरमध्ये जाते सांगितलं, प्रियकराला बोलावलं पण पतीला सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 18:58 IST2024-04-07T18:58:08+5:302024-04-07T18:58:38+5:30
लग्नाच्या २५ व्या दिवशी नवविवाहिता पतीला सोडून प्रियकरासह पळून जात होती.

नवविवाहितेचा कट! पार्लरमध्ये जाते सांगितलं, प्रियकराला बोलावलं पण पतीला सापडली
बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इथं नवविवाहित महिलेनं लग्न होऊन १ महिना न होताच जे केलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला. लग्नाच्या २५ व्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, वाटेत पतीनं तिला गाठलं अन् हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती. अशातच तिनं पार्लरला जाते असं सांगून तिथून पळ काढला. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तितक्यात पतीनं तिला दुसऱ्याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला. मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले.
दरम्यान, आपल्या पत्नीला अनोळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला. त्यानं आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला, तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. नवविवाहितेच्या पतीनं सांगितलं की, त्याचा विवाह ११ मार्च २०२४ रोजी झाला होता. पत्नीनं त्याला दमदाटी करून आपल्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता.
आत्महत्येची दिली धमकी
पत्नीच्या आग्रहास्तव पती तिला घेऊन त्याच्या सासरच्या घरी निघाला होता. मात्र, पत्नीनं प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला होता. नवविवाहित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, माझ्या विरोधाला न जुमानता कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीनं माझं लग्न लावून दिलं. मला आजही माझ्या प्रियकरासोबत राहायचं आहे. यानंतरही जबरदस्ती झाली तर मी आत्महत्या करून जीवन संपवेन. पण, मी माझ्या पतीसोबत राहणार नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.