विद्यार्थ्यांकडून शुल्क म्हणून कचरा घेणारी अनोखी शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:30 IST2022-11-22T14:29:57+5:302022-11-22T14:30:07+5:30
पद्मपाणी एज्युकेशनल ॲण्ड सोशल फाउंडेशन संचलित पद्मपाणी शाळा मुलांना नि:शुल्क शिक्षण देते.

विद्यार्थ्यांकडून शुल्क म्हणून कचरा घेणारी अनोखी शाळा
पाटणा : खासगी शाळा मुलांना शिकविण्यासाठी शुल्क म्हणून मोठी रक्कम घेतात; पण एक शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्क म्हणून पैसे नाही, तर प्लास्टिकचा कचरा घेते. ही आगळीवेगळी शाळा बिहारच्या गया जिल्ह्यात आहे.
बसाडी ग्रामपंचायतीतील सेवा बिघा येथील पद्मपाणी एज्युकेशनल ॲण्ड सोशल फाउंडेशन संचलित पद्मपाणी शाळा मुलांना नि:शुल्क शिक्षण देते. विद्यार्थ्यांकडून एक छदामही घेत नाही. मात्र, शुल्क म्हणून रस्त्यावर पडलेला सुका कचरा विद्यार्थ्यांना आणावा लागतो. विद्यार्थी रस्त्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा उचलून आणून शाळेबाहेरील कचरापेटीत टाकतात. हा कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवला जातो. तो विकून मिळणारे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले जातात. यातून विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व जेवणही दिले जाते. सोबतच या पैशांतून शिक्षकांचेही वेतन करण्यात येते. पद्मपाणी शाळेत विजेची जोडणी नाही. सौर ऊर्जेवर शाळा चालते.
संस्थेचे सहसंस्थापक राकेश रंजन यांनी सांगितले की, येथे दरवर्षी हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात. पर्यटक अनेकदा रस्त्यावरच कचरा फेकतात. शाळेतील विद्यार्थी हा कचरा उचलतात. यामुळे रस्त्यांची स्वच्छता होते तसेच स्थानिक लोकही जागरूक होतात. २०१४ मध्ये शाळा सुरू झाली. मात्र, रस्त्यावरील कचरा उचलण्याची मोहीम २०१८ पासून सुरू झाली.