बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका कुत्र्यामुळे एक ट्रेन तब्बल अर्धा तास एका स्टेशनवर थांबून राहिली. महिला प्रवाशांच्या डब्यात एका अज्ञात व्यक्तीने कुत्र्याला बांधून ठेवले होते. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सर्व महिला डब्यातून खाली उतरल्या. या कुत्र्याच्या भीतीने कोणीही डब्यात बसायला तयार नव्हते, त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
नेमका काय घडला प्रकार?हा प्रकार रक्सौल-समस्तीपूर पॅसेंजर ट्रेनमध्ये घडला. ही ट्रेन नरकटियागंज स्थानकावर पोहोचली असता, महिला प्रवाशांनी आरक्षित केलेल्या डब्यात एक पाळीव कुत्रा साखळीने सीटला बांधलेला दिसला. हा डबा ट्रेन लोकोपायलटच्या डब्याला लागूनच होता. डब्यात कुत्र्याला पाहताच महिला प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या महिला तातडीने डब्यातून खाली उतरल्या आणि त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला निर्णयघटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दल (RPF) आणि स्टेशन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. एका कुत्र्यामुळे ट्रेन तब्बल ३५ मिनिटे स्थानकावर थांबली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महिला प्रवाशांचा हा डबा कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून सील करण्यात आला. रात्री ८ वाजता ट्रेन पुढे रवाना झाली. पण, हे कृत्य कुणी केले आणि तो कुत्रा कुणाचा होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुत्र्याला 'एनिमल वेलफेयर बोर्ड'कडे सोपवले!या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तो कुत्रा ताब्यात घेतला. समस्तीपूर विभागाच्या डीआरएमच्या निर्देशानुसार, रेल्वे पोलिसांनी त्या कुत्र्याला दरभंगा येथील 'एनिमल वेलफेयर बोर्ड'कडे सोपवले आहे.