सर्व विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा? नव्या शैक्षणिक धोरणात तरतूद करण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 02:16 IST2023-05-31T02:16:00+5:302023-05-31T02:16:23+5:30
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनईपी) राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा सुचविण्यात आली आहे.

सर्व विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा? नव्या शैक्षणिक धोरणात तरतूद करण्याची सूचना
मुंबई : गेल्या काही वर्षांत नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. देशभरातील केंद्रीय विद्यापीठांसह सार्वजनिक व खासगी विद्यापीठांमध्ये शेकडो प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार वाढतो. तसेच वेळही वाया जातो. यावर तोडगा काढण्यासाठी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनईपी) राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा सुचविण्यात आली आहे.
शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार, विद्यापीठ प्रवेश परीक्षांची तत्त्वे एकसारखी असतील. त्यासाठी ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेईल. मात्र, या परीक्षेनुसार प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांवर सोपविण्यात आला आहे. एनटीए उच्च गुणवत्तेची सामान्य योग्यता चाचणी तसेच विज्ञान मानव्यशास्त्र, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयांमधील विशेषीकृत सामान्य विषय परीक्षा घेण्याचे काम करेल. या परीक्षांमध्ये संकल्पनांची समज आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता तपासली जाईल.
अशी असेल नवी प्रवेश परीक्षा...
पदवीपूर्व व पदवी अभ्यासक्रमांसाठी, फेलोशिपसाठी
परीक्षा देण्यासाठी विषयांची निवड करता येणार.
विद्यापीठ विद्यार्थ्याचा वैयक्तिक विषयांचा पोर्टपोलिओ पाहू शकेल.
वैयक्तिक आवडी व प्रतिभा यांच्या आधारे प्रवेश देऊ शकेल.
प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए स्वायत्त चाचणी संस्था म्हणून काम करेल.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची
शेकडो विद्यापीठांनी स्वत:च्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्याऐवजी, या एका परीक्षेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल. त्यांच्या प्रवेशासाठी एनटीए मूल्यांकन वापरण्याबाबतचा निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर सोडला जाईल, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.