संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:42 IST2025-10-18T16:07:39+5:302025-10-18T17:42:54+5:30
Fire In Delhi News: दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवास्स्थाने आहेत.

संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवास्स्थाने आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान कुठल्याही जीवितहानीचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.
हा परिसर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील मानला जात असल्याने आगीमुळे स्थानिक लोक आणि अधिकारी वर्गाने चिंता व्यक्त केली आहे. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नाची शर्थ करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची सहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.
आग लागल्यानंतरचे घटनास्थळावरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये पोलीस लोकांना बाहेर पडण्यासाठी विनवणी करत आहेत. तर बरेचसे लोक ग्राऊंड फ्लोअरबाहेर गोळा झालेले दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांमी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र फोन केल्यानंतर घटनास्थळी येण्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी उशीर केला, असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचले असते तर कमी नुकसान झाले असले, असा दावा या लोकांनी केला आहे.