१ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये अन् दागिने; एकुलत्या एक भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:16 IST2023-11-29T17:15:21+5:302023-11-29T17:16:03+5:30
एकुलत्या एक भाचीच्या लग्नात तिच्या मामानं जे केलं ते सर्वजण पाहतच बसले.

१ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये अन् दागिने; एकुलत्या एक भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'
मामा आणि भाचाचं, भाचीचं नातं काहीसं वेगळंच असतं. याचाच प्रत्यय देणारी अनोखी घटना हरयाणातून समोर आली आहे. खरं तर येथील रेवाडीमध्ये आपल्या एकुलत्या एक भाचीच्या लग्नात नवरीच्या मामानं जे केलं ते सर्वजण पाहतच बसले. सतबीर नावाच्या व्यक्तीनं त्याच्या भाचीच्या लग्नात कोट्यवधींचा वर्षाव केला. त्यानं भाचीला लग्नात १ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये रोखच दिले नाहीत तर कोट्यवधी रुपयांचे दागिनं देखील दिले आहेत. सध्या या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. माहितीनुसार, नवरीचा मामा सतबीर याचा स्वतःचा क्रेनचा व्यवसाय आहे, सतबीर नेहमी त्याच्या विधवा बहिणीला मदत करत असतो.
भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'
रेवाडी येथील असलवास हे सतबीरचं मूळ गाव. सतबीरच्या बहिणीचं लग्न सिंदरपूरमध्ये झालं होतं. पण तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्याची बहीण पडैय्याजवळ वास्तव्यास गेली जी आजही तिथेच राहते. सतबीरच्या एकुलत्या एक बहिणीच्या पतीचे खूप पूर्वी निधन झालं होतं, त्याला एक भाची आहे. तिच्याच लग्नाच्या एका कार्यक्रमासाठी (शगुन विधी) सतबीर बहिणीच्या गावी गेला होता. सायंकाळी कार्यक्रमाला सुरूवात होणार होती... मात्र कार्यक्रमाला सुरूवात होताच सतबीरने नोटांचे बंडल काढताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.
खरं तर सतबीरने बहिणीच्या घरी ५०० रुपयांच्या नोटांचा जणू काही पाऊसच पाडला. यावेळी एकूण एक कोटी, एक लाख, ५१ हजार १०१ रुपये रोख देण्यात आले. याशिवाय सतबीरने त्याची बहीण आणि भाचीला कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू देखील दिल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.