विवाहबाह्य संबंध, लग्नानंतरही तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं, पहिल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्याशी लग्न करणं असले प्रकार गेल्या काही काळात कमालीचे वाढले आहेत. त्यामधून अनेकदा काही चित्रविचित्र घटनाही घडतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील हमीरपूर येथे घडला आहे. येथे एक विवाहित महिलेने तिच्या पतीला सोडून प्रियकरासोबत गेली. एका मंदिरात अगदी थाटामाटात त्याचं लग्नही झालं. मात्र २४ तासांतच हे लग्न मोडून ही महिला पुन्हा पहिल्या पतीसोबत नांदायला घरी आली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हरी नावाचा २७ वर्षीय तरुण एका महिलेला आपल्यासोबत घेऊन आला होता. गावातील रामजानकी मंदिरात त्यांचं लग्न पार पडलं. लग्नाला ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, लग्नाला २४ तास उलटत नाहीत तोच या प्रेमकहाणीला नाट्यमय वळण लाभले. त्याचे झाले असे की, या या महिलेचा पहिला पती शिवशंकर हा आपल्या ४ मुलांना घेऊन तिच्या प्रियकराच्या घरी धडकला. आईला पाहताच मुलं जाऊन तिला बिलगली. आई पुन्हा भेटल्याने ती भावूक होऊन मोठमोठ्याने रडू लागली. मुलांच्या या हुंदक्यांमुळे त्या आईचं काळीज विरघळलं आणि मातृत्व जागृत झालेली ती महिला नव्याने लग्न केलेल्या प्रियकराला सोडून पुन्हा एकदा मुलं आणि पतीसोबत जाण्यास तयार झाली.
हा नाट्यमय घटनाक्रम पाहून पूर्ण परिसर अवाक् झाला. एका दिवसापूर्वी जे लोक विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांना या सर्वावर विश्वासच ठेवता येईना. हा प्रेमविवाह एका दिवसात कसा काय संपुष्टात आसा असा प्रश्न त्यांना पडला.
अखेरीस हे प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले. दरम्यान, हा तमाशा पाहण्यासाठी बाहेर बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी मातृत्व जागृत झालेल्या महिलेने आपल्याला पहिला पती आणि मुलांसोबत राहायचे असल्याचे सांगितले. या महिलेने स्वत: या निर्णयाची हमी दिली आणि पहिला पती आणि मुलांसह घरी निघून गेली. तर दुसरीकडे या महिलेसोबत २४ तासांपूर्वी थाटामाटात लग्न करणाऱ्या प्रियकरावर तोंड लपवण्याची वेळ आली. तो उपस्थितांची नजर चुकवून गर्दीतून गायब झाला.