सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलटनी रिस्क घेतली, एक शहीद दुसरा जखमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 23:05 IST2025-04-02T23:03:10+5:302025-04-02T23:05:44+5:30
Jamnagar Fighter Jet Crash: जखमी पायलटला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये हलवत वाचविले असून ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे.

सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलटनी रिस्क घेतली, एक शहीद दुसरा जखमी...
भारतीय हवाई दलाकडे आधीच लढाऊ विमाने कमी असताना एकामागोमाग एक असे अपघात होत आहेत. महिनाभरात दोन लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. बुधवारी रात्री गुजरातच्या जामनगर भागात हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. यात एक पायलट शहीद झाला असून दुसरा पायलट इजेक्ट झाल्याने जखमी झाला आहे.
जखमी पायलटला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये हलवत वाचविले असून ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. जामनगरच्या पोलीस प्रमुखांनी याबाबतची पुष्टी केली आहे. ७ मार्चला हरियाणाच्या अंबालामध्ये जग्वार लढाऊ विमान ट्रेनिंगवेळी कोसळले होते.
या विमानात दोन पायलट होते. विमान कोसळतेय हे समजताच एक पायलट सुरक्षितरित्या सीटसह इजेक्ट झाला, परंतू दुसरा पायलट सावरू शकला नाही. त्याचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलटला लोकांनी वाचविले आहे. जामनगरच्या नागरी वस्तीवर हे लढाऊ विमान कोसळणार होते. पायलटने हुशारीने ते विमान बाहेरील भागात नेले. आधीच इजेक्ट झाले असते तर कदाचित हे लढाऊ विमान घरांवर कोसळले असते पण पायलट वाचले असते. प्रसंगावधान राखत त्यांनी जिवाची बाजी लावली परंतू एका पायलटला प्राण गमवावे लागले आहेत.
पोलिसांनी अपघात स्थळाचा ताबा घेतला असून हवाई दलाचे अधिकारी देखील आले आहेत. हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
विमान कसे कोसळले आणि त्यात काय नुकसान झाले हे शोधण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत.