काश्मीरमध्ये लागली लॉस एंजेलिससारखी आग, कडाक्याच्या थंडीत पेटला वणवा, दोन गाव जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:19 IST2025-01-14T09:18:46+5:302025-01-14T09:19:06+5:30
Fire In Jammu & Kashmirs Kishtwar: लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत.

काश्मीरमध्ये लागली लॉस एंजेलिससारखी आग, कडाक्याच्या थंडीत पेटला वणवा, दोन गाव जळून खाक
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील जंगलांमध्ये लागलेली आग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरली आहे. या अग्नितांडवामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच लॉस एंजेलिस शहरात प्रचंड वित्तहानी झाली आहे. दरम्यान, आता लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान उणे झालेले आहे. या परिसरात सातत्याने हिमवृष्टी होत आहे. मात्र एवढ्या थंडीतही ही भीषण आग लागली आहे. किश्तवाडमधील दुर्गम भागात वसलेल्या बाडवन येथील मार्गी आणि मालवन गावांमध्ये ही आग लागली आहे. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेच्या समोर येत असलेल्या व्हिडीओंमधून आगीची भीषणता दिसून येत आहे.
या भीषण वणव्यात अनेक घरं जळून खाक झाली आहेत. तर शेकडो लोकांना या आगीचा फटका बसला आहे. लोकांनी स्थानिक पातळीवर बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्यापतरी आलेलं नाही.