"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी

By ओमकार संकपाळ | Published: May 9, 2024 06:16 PM2024-05-09T18:16:28+5:302024-05-09T18:22:21+5:30

मृत दाम्पत्याचा मुलगा पीयूष हा मागील चार वर्षांपासून कॅनडात स्थायिक आहे.

A couple in Surat, Gujarat ended their life after their son went to Canada because he was neglected | "आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी

"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी

मुलाने नवीन काहीतरी करण्याच्या हेतूने कर्ज काढले अन् तो आर्थिक समस्येचा सामना करू लागला. पोटचा मुलगा आर्थिक विवंचनेत असल्याचे पाहून आई-वडिलांनी मदतीचा हात पुढे करत लेकराला कर्जाच्या संकटातून बाहेर काढले. पण, ४० लाख रूपयांचे कर्ज फेडून दिल्यानंतर मुलाने आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत कॅनडाला जाणे पसंत केले. खरे तर आई-वडिलांनी त्याला कर्जातून मुक्त केल्यानंतर कॅनडाला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिथे गेल्यानंतर मुलाने आई-वडिलांची विचारपूस देखील केली नाही. याच धक्क्यातून त्याच्या आई-वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवले. 

संबंधित मुलगा कधीच त्याच्या आई-वडिलांशी प्रेमाने बोलला नाही. यामुळे त्रस्त असलेले आई-वडील नेहमी तणावात असत. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तब्बल चार पानांची सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली. गुजरातमधील सूरत येथील या घटनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. येथील ६६ वर्षीय चूनी भाई गेडिया आणि त्यांची ६४ वर्षीय पत्नी मुक्ताबेन गेडिया या दाम्पत्याने बुधवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या या दाम्पत्याचा मुलगा पीयूष हा ४ वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने कॅनडात स्थायिक झाला. त्याच्यावर ४० लाख रूपयांचे कर्ज होते. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी नातेवाईक, मित्र मंडळीकडून पैसा जमा केला आणि आपल्या मुलाला आर्थिक मदत केली होती. 

दाम्पत्याची आत्महत्या 
मुलाचे कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी इतरांकडून मदत घेतली. त्यानंतर मुलगा कर्जातून मुक्त झाला अन् त्याने कॅनडा गाठले. पण यामुळे त्याच्या वडिलांवर कर्जाचे ओझे आले. कॅनडात गेल्यानंतर पीयूषने त्याच्या आई-वडिलांना काहीच आर्थिक मदत केली नाही. तो फोनवरून देखील त्यांच्याशी संपर्क साधणे सातत्याने टाळत असे. पोटच्या मुलाने असा व्यवहार केल्याने हे दाम्पत्य चिंतेत होते. याच व्यापामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. 

आत्महत्या करण्यापूर्वी पीयूषचे वडील चुनी भाई यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली. यामध्ये त्यांनी नाना व्यथा मांडल्या. त्यांनी या माध्यमातून पीयूष आणि कॅनडामध्ये राहणारा त्यांचा दुसरा मुलगा संजय आणि सुनेचे आभार मानले. याशिवाय त्यांनी आवाहन केले की, अंतिम संस्कारासाठी कोणताही खर्च करू नका. मुलगा आणि सुनेकडून होत असलेला जाच देखील त्यांनी मांडला. मुलाचे कर्ज फेडले पण आम्ही ४० लाख रूपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन बसलो असून, आमचे आता हातपाय काम करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच जीवनाचा कंटाळा आला असल्याचे त्यांनी लिहिले. 

सुसाईड नोटमधून मांडली व्यथा
तसेच आमच्यावर आलेली ही वेळ केवळ आणि केवळ पीयूषमुळे आली आहे. कारण त्याचे कर्ज फेडण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले पण कालांतराने तो आम्हालाच विसरला. त्याच्यासाठी आम्ही घेतलेले कर्ज आमच्याने फेडणे आता होत नाही. आमच्याकडे असलेली रक्कम आणि सर्व दागिने त्याला दिले. मग त्याने व्याजावर आमच्याकडून रक्कम मागितली आणि परत करण्याचे आश्वासन दिले. पण एकदा रक्कम घेतल्यानंतर त्याने आमचे काहीच ऐकले नाही. आम्ही त्याला ३५ लाख रूपयांची मदत केली होती, असेही मृत दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले.  

दरम्यान, मृत दाम्पत्याचा मुलगा पीयूष हा मागील चार वर्षांपासून कॅनडात स्थायिक आहे. त्याने यादरम्यान त्याच्या आई-वडिलांना एकही कॉल केला नाही. तर, आई-वडिलांनी फोन केल्यावरही तो बोलण्यासाठी टाळाटाळ करायचा. मी त्याला पैशांची मागणी केली नाही पण आता मलाच माझी लाज वाटत असल्याचेही सुसाईड नोटच्या माध्यमातून पीयूषच्या वडिलांनी सांगितले. अखेर त्यांनी आपल्या मुलाची माफी मागत या जगाचा निरोप घेतला. 

Web Title: A couple in Surat, Gujarat ended their life after their son went to Canada because he was neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.