देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:55 IST2025-11-05T14:53:00+5:302025-11-05T14:55:40+5:30
राहुल गांधींमुळे निवडणूक जिंकू शकत नाही असं काँग्रेस नेते म्हणतात. बिहारमध्येही राहुल गांधींनी येऊ नये असं तिथल्या नेत्यांना वाटते असा टोला भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी लगावला.

देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन केले तो बोगस आहे. तर्क हिन गोष्टींना उत्तर दिले जात नाही. हरियाणात काँग्रेस त्यांच्या अंतर्गत कलहामुळे हरली. देशातील युवा पिढी नरेंद्र मोदींसोबत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत लागते. आम्ही इतक्या निवडणुका हरलो परंतु व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले नाहीत. लष्कराला टार्गेट करतात, सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. हे सर्व विचारपूर्वक केलेले षडयंत्र आहे. देशाबाहेरील शक्ती राहुल गांधींचा वापर करून देशातंर्गत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाजपाने पलटवार केला.
मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी हवेत आरोप करत आहेत. त्यामुळे राहुल गांधींना कुणी सीरियस घेत नाही. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. हरियाणात काँग्रेसच्या नेत्यांनीच पराभव का झाला याची कारणे दिली. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधी असे आरोप करत आहेत. खोटे फोटो, खोटी नावे घेऊन काँग्रेस वेळोवेळी बोलत असतात. बिहारमध्ये २ दिवसानंतर मतदान होणार त्याआधी हरियाणावर बोलले. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले. निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी परदेशात जातात. बिहारमध्ये निवडणूक असताना ते कोलंबियाला गेले. त्यामुळे परदेशात जातात, तिथून काही प्रेरणा मिळते, मग त्यांच्या टीमकडून माहिती घेऊन पत्रकारांचा वेळ वाया घालवतात असं त्यांनी म्हटलं.
तसेच २००४ मध्ये एक्झिट पोलमध्ये भाजपा जिंकेल असे बोलत होते, मात्र प्रत्यक्षात निकालात आम्ही हरलो. आम्ही प्रश्न उभे केले नाहीत. लोकशाहीत जय पराजय स्वीकारावा लागतो. आम्ही कधी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे केले नाहीत. वारंवार अटॅम बॉम्ब फुटणार बोलतात, पण अजून फुटला नाही. कुठलाही विषय गंभीरतेने घेऊन पुढे येत नाही. आज मला त्यांच्या आरोपांवर बोलावे लागते ही खंत वाटते. ३ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी मंत्र्याने राजीनामा दिला, त्यांनी हरियाणात काँग्रेसच काँग्रेसला हरवते, तिथे ताळमेळच नाही असा आरोप केला. दुसरीकडे राहुल गांधी मतचोरीचा आरोप करतात. सातत्याने निवडणुकीत पराभव होऊनही धडा घेत नाही. राहुल गांधींमुळे निवडणूक जिंकू शकत नाही असं काँग्रेस नेते म्हणतात. बिहारमध्येही राहुल गांधींनी येऊ नये असं तिथल्या नेत्यांना वाटते असा टोला भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी लगावला.
दरम्यान, आमची शिस्त, आमचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण ही आमची ताकद आहे. त्याच विश्वासाने आम्ही निवडणूक जिंकू असं बोलतो. आम्ही २४ तास धावतो. गावोगावी फिरतो ही भाजपाची व्यवस्था असते. मतदार यादी सगळ्यांकडे असते. राजकीय पक्ष ही यादी पाहू शकतो. त्यानंतर त्यावर आक्षेप घेता येऊ शकतो. तक्रार करण्याची व्यवस्था असते. चुकीचे काय असेल तर ती हटवण्याची प्रक्रियाही करून शकतो. बिहारमध्ये SIR झाली, जनता खुश आहे. जे मतदार तिथे नाहीत, मृत आहेत. शिफ्ट झालेले आहेत त्यांची नावे वगळली त्यांना तक्रार नाही परंतु राहुल गांधी रडत आहेत. राहुल गांधींचा जनतेशी कनेक्ट नाही. मतदान होताना तिथे केंद्रावर प्रत्येक राजकीय पक्षाचा एजेंट असतो. तिथे काँग्रेसचा एजेंट नव्हता का? मतदानात काही गडबड असेल तर निवडणूक आयोगाला तक्रार करतो, तिथे काही झाले नाही तर कोर्टात जाऊ शकतो. परंतु या लोकांना हे काही करायचे नाही. मी ७ निवडणुका लढलोय, अत्यंत पारदर्शकपणे मतदानापासून मतमोजणीपर्यंत सगळ्या गोष्टी पार पडतात. कुठे गडबड होते, अधिकाऱ्यांनी गडबड केली तर कोर्टात जा, निवडणूक आयोगाकडे तक्रार करत नाही. फक्त पत्रकार परिषद घेत आरोप केले जातात. लोकशाही अशी चालते का असा सवालही किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.
देशविरोधी षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही
आम्ही इतकी वर्ष विरोधात होतो, परंतु लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले नाहीत. मात्र राहुल गांधी परदेशात जातात, तिथे आपल्या लोकशाहीला बदनाम करतात. न्यायव्यवस्थेवर प्रश्न उभे करतात. जनतेत जात नाही मग निवडणूक हरणारच ना... तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल तिथे काँग्रेस कशी जिंकली, आम्ही प्रश्न विचारले. राहुल गांधी Gen Z यांना उकसवण्याचं काम करतात का, देशातील युवा पिढी नरेंद्र मोदींसोबत आहे. देशाला बदनाम करण्यासाठी देशविरोधी शक्तीसोबत मिळून जे षडयंत्र राहुल गांधी आखतायेत ते कधीही यशस्वी होणार नाही असंही किरेन रिजिजू यांनी म्हटलं.