अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:18 IST2025-06-29T05:17:47+5:302025-06-29T05:18:56+5:30

तुमच्या नावात 'शुभ' आहे. तुमची अंतराळयात्रा नवयुगाची सुरुवात आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे शनिवारी संवाद साधला.

A brilliant view of India from space; sees 16 sunrises, 16 sunsets every day... | अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल

अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल

नवी दिल्ली : तुमच्या नावात 'शुभ' आहे. तुमची अंतराळयात्रा नवयुगाची सुरुवात आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे शनिवारी संवाद साधला. अंतराळातून भारताचे भव्य, तेजस्वी दर्शन होते तसेच आम्ही दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो असे शुक्लांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी ‘भारतमाता की जय’ घोषणाही दिली.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर असा बहुमान शुभांशू शुक्ला यांनी मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या आपण दोघेच बोलतो आहोत, पण १४० कोटी भारतीय तुमच्यासोबत आहेत. तुम्ही राष्ट्रध्वज अंतराळात फडकवला आहे. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तुमचा हा अंतराळ प्रवास ‘विकसित भारता’साठी महत्त्वाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले. त्यावर शुभांशू म्हणाले की, अंतराळ प्रवास हा माझा वैयक्तिक पराक्रम नसून ही संपूर्ण देशासाठी महत्त्वाची घटना आहे. 

सोबत ‘गाजर हलवा, मूग डाळ हलवा, आंब्याचा रस’

तुम्ही अंतराळ सफरीवर गाजराचा हलवा घेऊन गेला आहात. तो तुम्ही मित्रांना खाऊ घातला का? या पंतप्रधान मोदी यांनी विचारलेल्या हलक्याफुलक्या प्रश्नावर शुभांशू शुक्ला म्हणाले की, मी गाजराचा हलवा तसेच मूग डाळीचा हलवा आणि आंब्याचा रसदेखील माझ्यासोबत येथे आणलेला होता.

हे पदार्थ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आम्ही एकत्र बसून खाल्ले. सर्वांना ते फार आवडले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘अंतराळ स्थानकात झोप घेणे हेदेखील मोठे आव्हान’

अंतराळवीर शुभांशू शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने जर मी पाय बांधले नाही तर हवेत उडू शकतो. त्यामुळे या स्थानकात झोप घेणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे.

शुभांशू शुक्ला हे व्हिडीओ कॉलद्वारे बोलत असताना या स्थानकात तिरंगा लावला असल्याचे दृश्य दिसत होते. त्याबद्दल ते म्हणाले की, तिरंगा राष्ट्रध्वज पाहताना माझे मन भावुक होते.

Web Title: A brilliant view of India from space; sees 16 sunrises, 16 sunsets every day...