सरकारी गोदामांतून चोरीला गेले ९०३ मेट्रिक टन धान्य; पंजाबमध्ये सर्वाधिक धान्य चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:01 IST2022-03-30T05:26:48+5:302022-03-30T06:01:32+5:30
महाराष्ट्रात धान्य चोरीची घटना नाही

सरकारी गोदामांतून चोरीला गेले ९०३ मेट्रिक टन धान्य; पंजाबमध्ये सर्वाधिक धान्य चोरी
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : देशभरातील सरकारी गोदामांतून ९०३.५ मेट्रिक टनापेक्षा अधिक गहू व तांदळाची चोरी झाली. मागील पाच वर्षांत झालेल्या चोरीतील अर्ध्यापेक्षा अधिक धान्य पंजाबमधील गोदामांतून चोरीला गेले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याची नोंद नाही. खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात चोरी झालेल्यामध्ये ४१४.५ मेट्रिक टन तांदूळ ४८९ मेट्रिक टन गहू समाविष्ट आहे.
विशेष म्हणजे धान्याच्या उत्पादनात सर्वांत अग्रणी व संपन्न मानल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये सर्वाधिक ५५४ मेट्रिक टन धान्याची चोरी झाली. त्या पाठोपाठ तामिळनाडू १४४ मे. टन, कर्नाटक ६३ मे.टन व मध्यप्रदेशात ६० मेट्रिक टनचोरी झाली. तर कमी संपन्न मानल्या जाणाऱ्या छत्तीसगढ व पश्चिम बंगालसारख्या देशांत धान्याची सर्वांत कमी चोरी झाली.
कोरोनाकाळात सर्वाधिक चोरी
२०२०-२१ या कालावधीत सर्वाधिक ३५३ मेट्रिक टन गहू, तांदळाची चोरी नोंदली गेली. या कालावधीत देशभर लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. याच कालावधीत सरकारने देशभरात ८० कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिले.
कठोर उपाय केले तरीही...
सरकारने कठोर उपाय केले तरी धान्याची चोरी झाली. एफसीआयच्या गोदामांत सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. याबरोबरच निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तारांचे कुंपण व रस्त्यांवर प्रकाशासाठी व्यवस्था केलेली असते. याशिवाय गोदामांना योग्य प्रकारे कुलूप लावले जाते. शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनिक कारवाईही केली जाते. वेळोवेळी साठ्याची तपासणी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाते. तरीही चोरी झालेली आहे.
या राज्यांत झाली सर्वाधिक धान्य चोरी (२०१६-२०२१)
राज्य चोरी (गहू, तांदूळ)
पंजाब ५५४.०१
तामिलनाडू १४४
कर्नाटक ६३.३९
मध्य प्रदेश ६०.५४
हरियाणा २६.५६
गुजरात १५.०२
अखिल भारतीय ९०३.५१