सरकारी रुग्णालयातील धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगा त्याच्या आजारी आईसाठी रक्ताची बॉटल हातात धरून असल्याचं दिसत आहे, तर वडील आईला एक्स-रे विभागात नेण्यासाठी स्ट्रेचर ओढत आहेत. वेदनादायक गोष्ट म्हणजे उपचारातील या निष्काळजीपणाची किंमत महिलेला जीवावर बेतली आहे. सीएमएस डॉ. सचिन माहूर यांनी प्राथमिक चौकशीनंतर पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
३ मे २०२५ रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय शकुंतला नायक यांना गंभीर अवस्थेत झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलं. पोटात संसर्गाची तक्रार केल्यानंतर, स्थानिक डॉक्टरांनी त्यांना झाशी येथे रेफर केलं, जिथे त्यांना वॉर्ड क्रमांक दोनमध्ये दाखल करण्यात आलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, शकुंतलाची प्रकृती गंभीर झाल्यावर डॉक्टरांनी रक्त चढवण्याचा सल्ला दिला.
८ मे रोजी रक्त देण्यास सुरुवात झाला, परंतु त्याच वेळी महिलेला एक्स-रेसाठी रेडिओलॉजी विभागात पाठवण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयातील कोणताही कर्मचारी किंवा वॉर्ड बॉय महिलेला तपासणीसाठी घेऊन गेला नाही. असहाय्य पतीने स्वतः स्ट्रेचर ओढलं आणि ९ वर्षांचा मुलगा सौरभ त्याच्या आईसोबत हातात रक्ताची बॉटल घेऊन चालत राहिला. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा फोटो काढला आणि तो फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यानंतर मेडिकल कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली.
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयंक सिंह यांनी सीएमएस डॉ. सचिन माहूर यांना तात्काळ चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर, सीएमएसने संबंधित वॉर्डला भेट दिली, सर्व कागदपत्र पाहिली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासणीत असं दिसून आले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेमुळे एका महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.