राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील डांटा शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका चिमुकलीसोबत विपरीत घडलं आहे. प्राची कुमावत ही इयत्ता चौथीत शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. त्यानंतर ती जेवणासाठी टिफिन उघडत असतानाच अचानक जमिनीवर कोसळली. तिचा टिफिन खाली सांडला आणि वर्गात एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू कुमार यांची ९ वर्षांची मुलगी प्राची कुमावत शाळेत गेली होती. ती टिफिन उघडत असताना अचानक बेशुद्ध पडली. वर्गात उपस्थित असलेल्या मुलांनी ताबडतोब शिक्षिकेला याबाबत माहिती दिली. शिक्षकांनी कोणताही विलंब न करता प्राचीला उचलून ताबडतोब डांटा रामगड सीएचसीमध्ये नेलं. येथे डॉक्टरांनी मुलीवर प्राथमिक उपचार केलं, त्यानंतर तिची प्रकृती नॉर्मल झाली. परंतु डॉक्टरांनी कोणताही धोका पत्करला नाही.
प्राचीला आणखी उपचारासाठी सिकरला रेफर केलं. मात्र दुर्दैवाने सिकरला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच मुलीचा मृत्यू झाला. कार्डिएक अरेस्टने मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएचसीचे प्रभारी डॉ. आर.के. जांगिड म्हणाले, "जेव्हा मुलीला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा ती बेशुद्ध होती. तपासणीदरम्यान तिला कार्डिएक अरेस्ट आल्याचं आढळून आलं. तातडीने उपचार सुरू करण्यात आले आणि तिला चांगल्या सुविधांसाठी रेफर करण्यात आलं, परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला."
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची कुमावतला काही दिवसांपासून सर्दी होती पण कोणालाही कल्पना नव्हती की एक किरकोळ समस्या तिचा जीव घेईल. मुलीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंब, शाळेचे कर्मचारी आणि गावातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.