धार्मिक यात्रेच्या नावाखाली रचला कट, 'सरबजीत' झाली 'नूर'; पाकिस्तानात शीख महिलेचे धर्मांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:03 IST2025-11-17T10:01:33+5:302025-11-17T11:03:05+5:30
पाकिस्तानात गेलेल्या सरबजीत कौरचा इस्लाम स्विकारल्याची कबुली देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

धार्मिक यात्रेच्या नावाखाली रचला कट, 'सरबजीत' झाली 'नूर'; पाकिस्तानात शीख महिलेचे धर्मांतर
Sarabjit Kaur: धार्मिक यात्रेसाठी पाकिस्तानात गेलेल्या एका भारतीय महिलेने तिथेच धर्म परिवर्तन करून एका पाकिस्तानी नागरिकाशी निकाह केल्याच्या घटनेने भारतात खळबळ उडाली आहे. कपूरथळा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सरबजीत कौर (४८) या महिलेने स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने आपले नाव बदलून नूर ठेवले आहे. एकटे जाण्याची परवानगी नसतानाही सरबजीत कोणालाही सोबत न घेता पाकिस्तानात गेली होती. या संपूर्ण प्रकरणाने केवळ प्रशासकीय यंत्रणेवरच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
९ वर्षांच्या प्रेमाची कबुली आणि धर्मांतर
४ नोव्हेंबर रोजी गुरुपर्वानिमित्त शीख भाविकांच्या जथ्थ्यासह सरबजीत कौर अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात गेली होती. ही यात्रा संपवून सर्व भाविक परत आले असताना, सरबजीत कौर मात्र पाकिस्तानातच थांबली. जत्था १० दिवसांनी भारतात परतल्यानंतर सरबजीत कौरचा शोध सुरू झाला असता या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली. तिथे तिने शेखपुरा येथील रहिवासी नसीर हुसैन नावाच्या व्यक्तीशी निकाह केला. पाकिस्तानमध्ये प्रवेश करताना इमिग्रेशन फॉर्ममध्ये सरबजीत कौरने राष्ट्रीयत्व आणि पासपोर्ट क्रमांक सारखे महत्त्वाचे रकाने जाणूनबुजून रिकामे सोडले होते.
या घटनेनंतर सरबजीत कौरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती स्पष्टपणे सांगताना दिसत आहे की, ती गेल्या ९ वर्षांपासून नसीर हुसैन याच्यावर प्रेम करत होती. तिने कोणत्याही दबावाखाली नव्हे, तर स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला असून, नसीर हुसैनसोबत लग्न केले आहे. दोन मुलांची आई असलेल्या आणि घटस्फोटित असलेल्या सरबजीतने आता आपले नाव नूर ठेवले आणि पतीसोबत पाकिस्तानातच राहायचे आहे असं म्हटलं.
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जबाब
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सरबजीत कौर ऊर्फ नूर हिने शनिवारी शेखपुरा येथील न्यायदंडाधिकारी शाहबाज हसन राणा यांच्यासमोर हजर होऊन आपले शपथपत्र सादर केले. या शपथपत्रात तिने स्पष्ट केले की, तिने पूर्णपणे स्वतंत्रपणे आणि स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि नसीर हुसैनशी विवाह केला आहे. तिने न्यायालयात सांगितले की, "मी गेल्या नऊ वर्षांपासून नसीरला ओळखत आहे आणि मी माझ्या इच्छेनुसार धर्मांतर करून त्याच्याशी निकाह करत आहे."
एसजीपीसीने झटकले हात
सरबजीत कौरच्या या निर्णयामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती या दोन्ही संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा यांनी ही घटना अपहरण असल्याचे म्हटलं.
दुसरीकडे, एसजीपीसीने या प्रकरणातून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. एसजीपीसीचे सचिव प्रताप सिंह यांनी चिंता व्यक्त करत म्हटले की, केंद्र सरकारने पाठवलेल्या अधिकृत यादीत सरबजीत कौरचे नाव नव्हते. भाविकांची पार्श्वभूमी तपासण्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची असते. जर सरबजीतचे इरादे संशयास्पद होते किंवा ती पाकिस्तानातील कोणाशी ऑनलाईन बोलत होती, तर ही माहिती तपास यंत्रणांकडे असायला हवी होती आणि तिला सीमा ओलांडण्यापूर्वीच थांबवता आले असते.
दरम्यान, कपूरथला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरबजीत कौरवर यापूर्वी फसवणुकी संबंधित तीन गुन्हे दाखल होते, जे आता मिटवण्यात आले आहेत. तिच्या लवजोत सिंह आणि नवजोत सिंह या दोन मुलांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० गुन्हे दाखल आहेत आणि ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.