आंध्र प्रदेशातील मंदिरात भक्तांमधील घबराटीमुळे चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:26 IST2025-11-02T14:26:09+5:302025-11-02T14:26:31+5:30
कासीबुग्गाच्या वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या घटनेत मृतांमध्ये ८ महिला, अल्पवयीन मुलाचा समावेश

आंध्र प्रदेशातील मंदिरात भक्तांमधील घबराटीमुळे चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू
कासीबुग्गा: आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा येथे शनिवारी वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीकाकुलम जिल्हाधिकारी स्वप्निल पुंडकर यांनी यापूर्वी मृतांचा आकडा दहा असल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ वर्षे वयाचा मुलगा व आठ महिलांचा मृत्यू झाला. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेंकटेश्वराचे मंदिर खासगी असून ते नुकतेच बांधण्यात आले आहे. मात्र श्रीकाकुलम जिल्हा पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी चेंगराचेंगरीतून ही दुर्घटना झाली नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मंदिराच्या पायऱ्यांजवळील लोखंडी रेलिंग कोसळल्यामुळे भक्तांमध्ये घबराट पसरली. त्यातील काही जण खाली पडले. त्यांच्या अंगावर काही लोक पडले. त्यातून नऊ जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. रेड्डी म्हणाले की, वेंकटेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत
वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
ते म्हणाले की, श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना वेदनादायी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मंदिरात कार्यक्रमाकरिता पोलिस बंदोबस्तासाठी व्यवस्थापनाने अर्जही केलेला नव्हता व परवानगीही घेतलेली नव्हती, असे श्रीकाकुलम पोलिसांनी सांगितले. २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील तीन प्रमुख मंदिरांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० जण जखमी झाले. जानेवारीत तिरुपतीमधील बैरागी पट्टाडा येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता.
कार्तिक मास, एकादशीमुळे भाविकांची वाढली गर्दी
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी सांगितले की, सदर मंदिरात दर्शनासाठी भक्त जात असताना रेलिंग तुटले आणि काही लोक खाली पडले. त्यांच्या अंगावर इतर लोक पडले. मंदिरात प्रत्येक शनिवारी दीड ते दोन हजार भक्त दर्शनासाठी येतात. कार्तिक मास व एकादशी एकाच तसेच शनिवारी आल्यामुळे मोठ्या संख्येने भक्त मंदिरात जमले आणि त्यातून ही दुर्घटना घडली.