जगातील टॉप ५० मध्ये भारताच्या ९ शिक्षण संस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:29 IST2025-03-13T11:17:21+5:302025-03-13T11:29:38+5:30
२ आयआयएम, जेएनयूच्या क्रमवारीत झाली घसरण

जगातील टॉप ५० मध्ये भारताच्या ९ शिक्षण संस्था
नवी दिल्ली : क्यूएस विषयांच्या क्रमवारीत जगातील टॉप ५० मध्ये नऊ भारतीय विद्यापीठे आणि संस्थांचा समावेश आहे. तीन आयआयटी, दोन आयआयएम आणि जेएनयूसारख्या काही संस्थांचा यात समावेश आहे. मात्र, दोन आयआयएम आणि जेएनयूच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
लंडनस्थित क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) द्वारे बुधवारी जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ रँकिंग बाय सब्जेक्टच्या १५ व्या आवृत्तीनुसार, विषय क्रमवारी आणि व्यापक प्राध्यापकांच्या क्षेत्रात भारताने टॉप ५० मध्ये १२ स्थान मिळवले आहे. धनबाद येथील इंडियन स्कूल ऑफ माइन्स (आयएसएम) अभियांत्रिकी - खनिजे आणि खाणकाम या विषयासाठी जागतिक स्तरावर २० व्या क्रमांकावर आहे.
क्रमवारीत घसरण कुठे?
अभियांत्रिकी-खनिज आणि खाणकाम विषयासाठी आयआयटी, मुंबई आणि खरगपूर अनुक्रमे २८ व्या आणि ४५ व्या क्रमांकावर आहेत. मात्र, दोन्ही संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
आयआयएम, अहमदाबाद आणि बंगळुरू हे व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जगातील टॉप ५० मध्ये राहिले; परंतु त्यांचे रँकिंगही गेल्या वर्षीपेक्षा घसरले. आयआयएम अहमदाबादचे रँकिंग २२ वरून २७ वर घसरले आहे.
भारत पाचव्या क्रमांकावर
विशिष्ट क्रमवारीच्या यादीत, भारत हा चीन, अमेरिका, यूके आणि कोरियानंतर पाचव्या क्रमांकावर आहे आणि एकूण नोंदींच्या संख्येत १२ व्या क्रमांकावर आहे. जरी भारत एआयमध्ये ताकद दाखवत असला, तरी उद्योजकीय क्षमतांमध्ये गंभीर अंतर कायम आहे.