वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू
By Admin | Updated: January 19, 2017 12:33 IST2017-01-19T10:11:58+5:302017-01-19T12:33:58+5:30
वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तब्बल ८०, ६६५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी, मुंबईच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली असून मृतांचा हा आकडा १९९५ सालापेक्षा दुप्पट असल्याचे समजते. एवढेच नव्ह तर दिल्ली व मुंबई या दोन्ही शहरांचे वायूप्रदूषणामुळे २०१५साली सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे.
दर दशकानंतर वायू प्रदूषणामुळे आरोग्य आणि पर्यायाने उत्पादन क्षमतेवर होणा-या विपरीत परिणामांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आलेल्या या अभ्यासात, हवेतील धुलीकणांचे प्रमाण, लोकसंख्या व मृत्यूदर यांच्या परिणामांची सांगड घालण्यात आली आहे. लेखिका कमल ज्योती माजी यांनी या संदर्भात अभ्यास केला असून 'एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च जनरल'मध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे.
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे होणा-या अकाली मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १९९५ साली १९,७१६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, २०१५ साली हाच आकडा ४८,६५१ पोहोचल्याचे दिसून आले. तर मुंबईत १९९५ साली १९,२९१ जणांनी जीव गमावला होती, २०१५ साली तो आकडा ३२,०१४ वर गेला.