Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 06:14 IST2025-11-20T06:13:16+5:302025-11-20T06:14:01+5:30
Naxals Killed in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात बुधवारी मारेडूमिल्ली येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले.

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
आंध्र प्रदेशात बुधवारी मारेडूमिल्ली येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. याच परिसरात मंगळवारी कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याच्यासह सहा नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. तसेच या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पोलिस कारवाईमध्ये सीपीआय (माओवादी) संघटनेच्या ५० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.
विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस महासंचालक (इंटेलिजन्स) महेशचंद्र लड्डा यांनी सांगितले की, हिडमाला मंगळवारी जिथे टिपले तेथून सात किमीवर मारेडूमल्ली येथे बुधवारी सकाळी सात वाजता दुसरी चकमक झाली. यात ठार झालेल्या सात जणांमध्ये तीन महिलांसह मेटुरू जोगाराव ऊर्फ ‘टेक शंकर’ याचा समावेश आहे. टेक शंकर हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. त्याने मागील काही वर्षांत छत्तीसगड व आंध्र-ओडिशा भागात लँडमाइन व स्फोटक हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटक रचना यात त्याचे विशेष कौशल्य होते.
छत्तीसगडध्ये सततच्या कारवायांमुळे अनेक नक्षलली आंध्र प्रदेशात पलायन करत आहेत. कृष्णा, एलुरू, एनटीआर, काकीनाडा आणि कोनसीमा जिल्ह्यांमध्ये तसेच विजयवाडा शहरातून पोलिसांनी ५० नक्षलींना अटक केली. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी ३९ शस्त्रे, ३०२ जिवंत काडतुसे, डिटोनेटर, १३ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.
पोलिस अधिकारी शहीद
छत्तीसगड–मध्य प्रदेश सीमेजवळ कांगुर्रा येथील जंगलात नक्षलवाद्यांसोबत बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत मध्य प्रदेशातील एक पोलिस अधिकारी शहीद झाले.