नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीच्या गोकुळपुरी भागात झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री आग लागून ७ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मदतीची तर, अल्पवयीन मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
ज्या लोकांच्या झोपड्या यात जळाल्या आहेत, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचेही केजरीवाल यांनी जाहीर केले. या आगीत एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन रोशन (१३), तिची बहीण दीपिका (९) यांचा मृत्यू झाला. अन्य पाच मृतांमध्ये बबलू (३२), रंजीत (२५), रेशमा (१८), प्रियंका (२०), शहंशाह (१०) यांचा समावेश आहे. रोशन आणि दीपिकाचे आजोबा दादा संतू यांनी सांगितले की, ही आग रात्री १२.३०च्या सुमारास लागली. तेव्हा आम्ही झोपलो होतो. जीव वाचविण्यासाठी आम्ही बाहेर पळालो.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती आम्हाला रात्री १.०३ वाजता मिळाली. त्यानंतर १३ वाहने आग विझविण्यासाठी पाठविण्यात आली. घटनास्थळावरून ७ मृतदेह मिळाले आहेत. जवळपास ६० झोपड्या जळाल्या आहेत. तर, ३० झोपड्या खाक झाल्या आहेत.