दिल्लीतील जैतपूर भागात मुसळधार पावसामुळे शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात एका घराची भिंत कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यापैकी ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले.
अतिरिक्त डीसीपी (दक्षिण पूर्व) ऐश्वर्या शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एका जुन्या मंदिराजवळ घडली जिथे अनेक भंगार विक्रेते शेजारील झुगींमध्ये राहत होते. मुसळधार पावसामुळे भिंत अचानक कोसळल्याने आठ रहिवासी अडकले. सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये ३ पुरुष, २ महिला आणि २ लहान मुलींचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित तीन जणांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने सर्वांचा मृत्यू झाला. तर, एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शबीबुल (वय, ३०), रबीबूल (वय, ३०), मुत्तू (वय, ४५), रुबिना (वय, २५) डॉली (वय, २५) रुखसाना (वय, ६) आणि हसिना (वय, ७) अशी मृतांची नावे आहेत. तर, हसीबुल नावाच्या व्यक्तीवर जखमी सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक रहिवासी आनंद जयस्वाल यांनी सांगितले की, अपघात घडताच परिसरातील अनेक नागरिक पुढे सरसावले आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बाहेर काढण्यात आलेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक होती, असेही त्यांनी सांगितले.