दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:43 AM2024-08-22T05:43:47+5:302024-08-22T05:48:57+5:30
५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले.
नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी १०वी व १२वीच्या परीक्षेत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे केंद्रीय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालयांतून मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक संख्येने बारावीची परीक्षा दिली. मात्र, याच्या अगदी उलट चित्र खासगी शाळा किंवा सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये होते.
गेल्या वर्षी इयत्ता दहावीतील ३३.५ लाख विद्यार्थी पुढच्या इयत्तेत पोहोचले नाहीत. ५.५ लाख विद्यार्थी १०वीच्या परीक्षेला बसले नाहीत तर २८ लाख विद्यार्थी नापास झाले.
त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ३३.५ लाख विद्यार्थी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यातील ५.५ लाख विद्यार्थी परीक्षेलाच बसले नाहीत तर २८ लाख जण परीक्षेत नापास झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावी नापासांत मध्य प्रदेश पहिला
दहावीत अपयश आलेले सर्वाधिक विद्यार्थी मध्य प्रदेशात, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशचा क्रमांक. बारावीत नापासांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक.